|Thursday, October 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भयमुक्त शिक्षण

भयमुक्त शिक्षण 

शिक्षणप्रक्रियेतील छडीचा वापर हा अनादिकालापासून चालत आला आहे. आपल्याकडे अशी म्हणच आहे, की ‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम’. इंग्रजीतदेखील ‘स्पेयर द रॉड ऍण्ड स्पॉईल द चाईल्ड’ अशी म्हण आहे. मुलांना शिक्षा केली नाही तर ते शिकणार नाहीत, त्यांच्यावर चांगले संस्कार करता येणार नाहीत असा पारंपरिक विश्वासच आहे. एकदा दलाई लामांना एका वार्ताहराने विचारले, की अगदी बालपणीच तुमची दलाई लामा म्हणून निवड झाली होती तर तुम्हाला शाळेत अत्यंत आदराची वागणूक मिळाली असेल, शिक्षकांनी शिकवताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिक्षा केली नसेल. यावर दलाई लामा म्हणाले, की असे मुळीच नाही. उलट सामान्य मुलांना शिक्षा करण्यासाठी जशी सामान्य प्रकारची छडी वापरण्यात येत असे तशी त्यांच्यासारख्या अतिविशिष्ट विद्यार्थ्याला शिक्षा करण्यासाठी छानप्रकारे सजवलेली विशिष्ट छडीच वापरण्यात येत असे. जे. कृष्णमूर्तीनादेखील बालपणी शाळेत जवळजवळ रोजच शिक्षा होत असे. अभ्यासात कच्चा म्हणून, गृहपाठ केला नाही म्हणून त्यांना तास न् तास वर्गाबाहेर उभे करण्यात येत असे. असे दिसते, की कोणीही या शालेय शिक्षेच्या जाचातून सुटलेले नाही.

शिक्षणात भयाचा वापर हा एक प्रकारचा आतंकवादच नव्हे का? आतंकवादी हे बंदुकीचा धाक दाखवून अथवा जीवे मारण्याची धमकी देऊन किंवा मोठय़ा प्रमाणावर मालमत्तेची हानी घडवून आणण्याची भीती दाखवून आपल्या मागण्या मान्य करून घेत असतात. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षेचे भय दाखवून विशिष्ट प्रकारे वागण्यास भाग पाडतो, तेव्हा तो आतंकवाद्यासारखाच वागत नसतो का? विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता पाळावी, अभ्यास करावा, दिलेला गृहपाठ व वर्गपाठ नियमितपणे करावा, शिस्तीचे पालन करावे म्हणून त्यांना शिक्षेचा धाक दाखवण्यात येतो. विद्यार्थीदेखील शिक्षेच्या भीतीने या गोष्टी करतात. परंतु त्यात त्यांना या गोष्टींच्या योग्यायोग्यतेचा कोणताही बोध झालेला नसतो. केवळ शिक्षा टाळण्यासाठी ते तसे करत असतात. भयापोटी केलेल्या गोष्टी या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. शिक्षकाच्या धाकाने जर विद्यार्थी शिस्त पाळत असेल तर शिक्षक जवळ असेपर्यंतच तो ती पाळेल. शिक्षकाची पाठ फिरताच तो पुन्हा बेशिस्तपणे वागायला लागेल. भीतीमुळे विद्यार्थ्यात कोणत्याही प्रकारचे आकलन निर्माण होत नाही. उलट तो अयोग्य गोष्टी लपून छपून करण्यास शिकतो. असे विद्यार्थी जेव्हा देशाचे नागरिक बनतात तेव्हा ते कायद्याचे पालन न करता शिक्षा टाळून ते कसे मोडता येतील यात वाकबगार
बनतात.

शिक्षेचे विरुद्ध टोक म्हणजे बक्षीस. याचाही शिक्षणप्रक्रियेत सर्रास वापर केला जातो. बक्षीस व शिक्षा ही खरे तर प्राण्यांना शिकवण्याची पद्धत झाली, माणसांना नव्हे. माणसामध्ये जशी नावडत्या गोष्टींची अथवा वेदनेची भीती असते, तशीच त्याच्यामध्ये आवडत्या गोष्टींची अथवा सुखसंवेदनेची हावदेखील असते. बक्षिसामध्ये नेमक्मया याच मनोवृत्तीचा फायदा उठवला जातो. परीक्षेत चांगले गुण मिळवले तर मोबाईल, टू-व्हीलर अथवा अन्य कोणतीतरी वस्तू घेऊन देईन या म्हणण्यामागे या गोष्टींसंबंधी वाटणाऱया लोभाचा फायदा उठवण्याची भावना असते. विद्यार्थी जेव्हा बक्षिसासाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करतो, तेव्हा तो विषय समजावून घेण्यापेक्षा बक्षिसालाच अधिक महत्त्व प्राप्त होते. भीतीप्रमाणेच बक्षिसानेदेखील विद्यार्थ्यात कोणत्याही गोष्टीचे आकलन निर्माण होत नाही. उलट त्याच्यातील सर्जनशीलता नष्ट होते. यासंबंधी शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगाचा या ठिकाणी उल्लेख करणे उचित ठरेल. त्यांनी माकडांच्या एका गटाला कागद व रंग खेळावयास दिले. त्या रंगांचा कागदावरील वापर व त्यामुळे कागदावर निर्माण होणारे रंगीबेरंगी आकार यात माकडांना खूपच मजा वाटू लागली. ते त्या खेळामध्ये गुंग होऊन गेले. माकडांचा खेळ संपल्यावर जेव्हा शास्त्रज्ञांनी ते कागद तपासले तेव्हा त्यांना त्यावरील काही चित्रे खूप कलात्मक व सर्जनशील वाटली. नंतर शास्त्रज्ञांनी या प्रयोगामध्ये बक्षिसाचा घटक आणला. ज्या माकडांची चित्रे कलात्मक असतील त्यांना ते बक्षीस देऊ लागले. लवकरच कागदावरील विशिष्ट प्रकारचे आकार व मिळणारे बक्षीस यातील संबंध माकडांच्या लक्षात आला व आता ते बक्षीस मिळवण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारची चित्रे काढण्याचा प्रयत्न करू लागले. अशा प्रकारे काढलेल्या चित्रांमध्ये शास्त्रज्ञांना कोणतीही कलात्मकता अथवा सर्जनशीलता दिसून आली नाही. माकडांमधील हे गुण लुप्त झाले होते. बक्षीस मिळवण्यासाठी म्हणून मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट करतो, तेव्हा त्याचे सर्व लक्ष बक्षीस व त्यातून मिळणारा फायदा याकडे असते. असा मनुष्य मग ती गोष्ट करण्याच्या प्रक्रियेतील आनंद घेऊ शकत नाही. यातूनच पुढे भविष्यातील सुखासाठी वर्तमानाचा बळी देण्याची प्रवृत्ती तयार होते. अशा प्रकारच्या मनोवृत्तीने मानवी जीवनात आत्तापर्यंत खूपच उलथापालथ घडवून आणली आहे. भयाचा कोणत्याही प्रकारे वापर न करता शिक्षण देणे शक्मय आहे का? या प्रश्नाला बहुतेक शिक्षकांचे नाही असेच उत्तर येते. त्याचे कारण मुलांना कशाचाच धाक राहिला नाही तर ते वाटेल तसे वागायला लागतील व मग त्यांना शिकवणे अवघड जाईल अशी शिक्षकांना भीती वाटत असते. परंतु भीतीद्वारे शिक्षक ज्या गोष्टी विद्यार्थ्यांकडून करून घेतो त्या तो अन्य मार्गाने करून घेण्याचा का प्रयत्न करत नाही? उदाहरणार्थ एखादी रोमहर्षक गोष्ट ऐकवताना मुलांना लक्ष द्या असे सांगावे लागत नाही. त्याचप्रमाणे जे शिकवायचे आहे ते अधिक रोचकपणे शिकवले तर विद्यार्थी आपोआपच लक्ष देतील. परंतु शिक्षकाला भीतीचा मार्ग हा जवळचा व कमी त्रासाचा वाटत असतो. भीतीचा हा घटक विद्यार्थ्यांइतकाच शिक्षकातदेखील असतो. जेव्हा शिक्षक हा स्वतःच भयग्रस्त असेल तेव्हा तो विद्यार्थ्यांला कसे भयमुक्त करू शकेल?ज्ञानाच्या बाबतीत शिक्षक विद्यार्थ्यापेक्षा वरचढ असला तरी मानसशास्त्रीयदृष्टय़ा तो विद्यार्थ्यांइतकाच अगतिक व अनभिज्ञ आहे, कारण त्याच्यातही भय, क्रोध, हिंसा, असुरक्षितता, लोभ, वासना इत्यादी घटक आहेत आणि दोन अनभिज्ञ व्यक्ती जेव्हा शिकण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात शिकणारा व शिकवणारा असा भेद करता येत नाही. दोघांनी एकत्रितपणे शिकणे हा एकच पर्याय त्याठिकाणी उरतो. अशा प्रकारे शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांसमवेत शिकू लागेल तेव्हा विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील खऱया अडचणी त्याच्या ध्यानात येऊ लागतील. मग शिक्षण हे केवळ माहिती संक्रमण न राहता दोघांनी मिळून एकत्रितपणे घेतलेला विषयाचा शोध होईल. या शोधात शिकण्या-शिकवण्यातील रटाळपणा व तोचतोपणा असणार नाही. उलट त्यात विषयाचा उलगडा झाल्याचा आनंद असेल. शिक्षणप्रक्रियेतील हा आनंदच भयाचा वापर अनावश्यक ठरवेल.

Related posts: