|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचे दर्शन

सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचे दर्शन 

संग्राम कासले / मालवण भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली संस्कृती विसरत नाही. जगात कुठेही असला तरी तो भारतीय संस्कृतीशी संबधित असणारे सण व उत्सव उत्साहाने साजरा करतो. ‘रेडिओ जिंदगी’ या रेडिओच्या सहकार्याने कॅलिफोर्नियामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. या सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने अमेरिकेतील भारतीय नागरिक सहभागी होतात.

 ‘रेडिओ जिंदगी’ या रेडिओच्या सहकार्याने अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील ग्रेट अमेरिका पार्क येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदाचे या सार्वजनिक गणेशोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. ग्रेट अमेरिका पार्क येथे विराजमान झालेली गणरायाची भव्य मूर्ती मुंबई येथून नेण्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी ग्रेट अमेरिका पार्क येथे गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. तर 4 सप्टेंबरला गणरायाच्या छोटय़ा मूर्तीचे सॅन फ्रॅन्सिसको येथील प्रशांत महासागरात विसर्जन करण्यात येणार आहे.

चार दिवसात भारतीय संस्कृतीचे दर्शन

कॅलिफोर्नियातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आणि गणरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. चार दिवस सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया नृत्य व गीतांचे कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये 700 मुलांनी सहभाग घेतला होता.

कोकणातला गणेशोत्सव आठवला

मूळ दांडी मालवण येथील रहिवासी गणेश दुधवडकर हे अमेरिकेत कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. दुधवडकर हे रेडिओ जिंदगीच्यावतीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी झाले आहेत. ‘तरुण भारत’शी बोलतांना ते म्हणाले, अमेरिकेत असताना नेहमीच कोकणातील सण, उत्सव यांची आठवण येते. परंतु रेडिओ जिंदगीने सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करून कोकणातील गणेशोत्सवाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक भारतीय नागरिकांना एकत्र भेटण्याचा योग आला.