|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ब्ल्यू व्हेलवर बंदीचा मार्ग शोधावा : उच्च न्यायालय

ब्ल्यू व्हेलवर बंदीचा मार्ग शोधावा : उच्च न्यायालय 

राज्य-केंद्र सरकारला निर्देश : देशात 7 दिवसात गेमने घेतले चार बळी

वृत्तसंस्था/ मदुराई

 जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमबाबत मद्रास उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. या गेमवर बंदी घालण्याचा मार्ग शोधावा असा निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला दिला. राज्य आणि केंद्र सरकारकरता याविषयी न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे देखील सादर केली. जवळपास 7 दिवसात या गेमपायी 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. ब्ल्यू व्हेल हा एक ऑनलाईन गेम असून यात काही टप्प्यानंतर खेळणाऱया व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाते. मध्यप्रदेशच्या दमोहमध्ये याच गेमपोटी एका मुलाने शनिवारी आत्महत्या केली होती.

मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वतः हस्तक्षेप करत सुनावणी सुरू केली. सोमवारी याप्रकरणाची सुनावणी मदुराई खंडपीठाचे न्यायाधीश के.के. श्रीधरन आणि जी.आर. स्वामीनाथन यांनी घेतली. खंडपीठाने या याचिकेवरून केंद्रीय माहिती सचिव तसेच गृह सचिवांना नोटीस बजावली. अलिकडेच मदुराईच्या एका मुलाने आत्महत्या केली होती. परंतु जीव देण्याअगोदर त्याने आणखी 75 जणांना हा गेम फॉरवर्ड केला होता. परंतु या सर्वांना गेम खेळण्यापासून रोखण्यात आले होते. उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालक आणि गृहसचिवांना कठोर आदेश देत या गेमला शेअर करणाऱयांवर कारवाई केली जावी अशी सूचना केली.

7 दिवसांचा गुगल ट्रेंड

7 दिवसांमध्ये इंदोर, भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर यासारख्या मोठय़ा शहरांसह छतरपूर, शहडोल, होशंगाबाद समवेत मध्यप्रदेशच्या 27 शहरांमध्ये ब्ल्यू व्हेल गेम सर्च करण्यात आला. हा ट्रेंड 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंतचा आहे. यादरम्यान या गेमचा सर्वाधिक शोध छतरपूरमध्ये घेण्यात आला.

7 दिवसात 4 बळी

1 सप्टेंबर : गुजरातमध्ये 20 वर्षीय अशोक मुलाणाने नदीत उडी घेत जीव दिला.

31 ऑगस्ट : पुड्डुचेरीत एमबीएचा विद्यार्थी शशिकुमारने गळफास लावून घेतला.

30 ऑगस्ट :  मदुराईमध्ये बी.कॉमचा विद्यार्थी
19 वर्षीय विग्नेशने गळफास लावून घेतला.

गेम नव्हे सापळा

किशोरवयीन मुले गेम मानून ब्ल्यू व्हेलच्या सापळ्यात अडकत आहेत. मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर ब्ल्यू व्हेल ऍपचा शोध वाढलाय. प्रत्यक्षात हा गेम तसेच ऍप देखील नाही. ब्ल्यू व्हेल हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी रचलेला एक सापळा असून त्याने जगभरात आतापर्यंत 130 पेक्षा अधिक जणांचा जीव घेतलाय. लहान वयाची मुले याचे शिकार होताहेत. ब्ल्यू व्हेलची निर्मिती रशियाच्या फिलिप बुडेईकिन याने केली असून सध्या तो तुरुंगात कैद आहे. गेमचा उद्देश समाजाची स्वच्छता करणे असून आत्महत्या करणारे सर्वजण ‘बायो वेस्ट’ (जैव कचरा) होते असे फिलिपने म्हटले होते.