|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर 

प्रतिनिधी / ओरोस :

  उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. जिल्हय़ातील दोन महिला व चार पुरुष पदवीधर  शिक्षकांसह एक उच्चश्रेणी मुख्याध्यापक आणि एक उपशिक्षक अशा आठ शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. शिक्षक दिनी पुरस्कार जाहीर करून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी शिक्षकांना अनोखी भेट दिली आहे.

  वेंगुर्ले तालुक्यातून सीताराम राया लांबर (उपशिक्षक), देवगड तालुक्यामधून प्रकाश राजाराम फोंडके (पदवीधर शिक्षक), सावंतवाडी तालुक्यातून बाबाजी गोपाळ झेंडे (पदवीधर शिक्षक), वैभववाडी तालुक्यातून आस्लम याकुब पाटणकर (पदवीधर शिक्षक), कुडाळ तालुक्यामधून महेश सहदेव गावडे (पदवीधर शिक्षक), कणकवली तालुक्यातून संजय भगवान कदम (उच्चश्रेणी मुख्याध्यापक), मालवण तालुक्यामधून स्मिता गोपाळ परब (पदवीधर शिक्षक) तर दोडामार्ग तालुक्यातून गीतांजली संतोष सातार्डेकर (पदवीधर शिक्षक) यांना हे 2017-18 साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

     ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने पुरस्कार वितरण सोहळा आचारसंहिता संपल्यानंतर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रत्येक तालुक्यातून एक अशा आठ शिक्षकांना दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समिती प्राप्त प्रस्तावांमधून पात्र प्रस्तावांची छाननी करून शिफारशीसह मंजुरीसाठी ते आयुक्त कार्यालयाकडे सादर करते.

  यावर्षी कणकवली तालक्यातून सहा, सावंतवाडी तालुक्यातून तीन, कुडाळ तालुक्यातून दोन, वैभववाडी तालुक्यामधून दोन, मालवण तालुक्यामधून दोन, तर देवगड, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यातून प्रत्येकी एक असे 18 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातून आठ प्रस्तावांची निवड समितीकडून करण्यात आली.