|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चोऱयांचे सत्र सुरुच

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चोऱयांचे सत्र सुरुच 

सदाशिवनगर येथे अडीच लाखाची घरफोडी

प्रतिनिधी / बेळगाव

गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत शहर व उपनगरात चोऱया, घरफोडय़ा चेन स्नॅचिंगचे सत्र सुरुच आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा गणेशोत्सव बंदोबस्तात गुंतलेले असताना चोरटय़ांनी धुमाकुळ घातला आहे. 24 तासात सदाशिवनगर येथे एकाच परिसरात दोन घटना घडल्या आहेत. एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. तर एका महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकाण्याचा प्रकारही घडला आहे.

पहिली घटना सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास सदाशिवनगर येथील शिवालयाजवळ उघडकीस आली. तरुण भारतचे कर्मचारी सतीश हिंडलगेकर यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात मंगळवारी या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

सतीश हिंडलगेकर हे सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलुप लावून देखावे पाहण्यासाठी गेले होते. गणेशोत्सवानिमित्त पत्नी माहेरी गेल्या होत्या. वडगाव येथे पत्नीला भेटून मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी पोहोचले. त्यावेळी घरचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी 10.30 ते 12.30 या वेळेत कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे.

कपाटातील आठ तोळय़ाचे सोन्याचे दागिने, चांदी व 4 हजार रुपये रोख रक्कम लांबविले आहेत. चेन, बांगडय़ा, अंगठी आदी दागिने चोरटय़ांनी पळविले आहेत. मध्यरात्री एपीएमसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. गुन्हेगार स्थानिक आहेत की बाहेरचे याचा तपास करण्यात येत आहे.

गणेश चतुर्थीपासून शहर व उपनगरात चोऱया व घरफोडय़ांच्या घटना रोजच घडू लागल्या आहेत. आनंदनगर-वडगाव, अनगोळ, मजगाव, माळमारुती, शिंदोळी आदी परिसरात 12 हून अधिक चोऱया व घरफोडय़ा घडल्या आहेत. यापैकी एकाही प्रकरणाचा तपास लागला नाही. संपूर्ण पोलीस यंत्रणा गणेशोत्सव बंदोबस्तात गुंतलेले असताना गुन्हेगारांनी शहरात उच्छाद मांडला आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या ठशांचे नमुने मिळविले असून त्यावरुन त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

महिलेचे मंगळसूत्र पळविले

सदाशिवनगर येथील शिवालय परिसरात मंगळवारी दुपारी चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे. आयोध्यानगर येथील नीललोचना मल्लिकार्जुन चचडी (वय 50) या मंगळवारी दुपारी सदाशिवनगर येथील आपल्या मैत्रीणीच्या घरी गेल्या होत्या. तेथून बाहेर पडताना मोटार सायकलवरुन आलेल्या दोघा भामटय़ांनी त्यांच्या गळय़ातील 40 ग्रॅमच्या मंगळसूत्राला हिसडा मारला. पाठिमागून येवून हे कृत्य करण्यात आले. वेळीच जागरुक झालेल्या नीललोचना यांनी आपल्या गळय़ातील मंगळसूत्र घट्ट पकडल्याने 10 ग्रॅमचा तुकडा भामटय़ांच्या हातात सापडला तर उर्वरित 30 ग्रॅमचा तुकडा खाली पडला. दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सायंकाळी एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

चोरांविरुध्द नागरिक एकवटले

शिंदोळी, निलजी, श्रीराम कॉलनी, गोकुलनगर परिसरातील वाढत्या घरफोडय़ांमुळे  या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या परिसरात केवळ महिन्याभरात 15 हून अधिक चोऱया झाल्या आहेत. मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करुनही एकाही प्रकरणाचा अद्याप तपास लागला नाही. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी नागरिकांनी पथके तयार केली आहेत. काही प्रमुखांच्या मोबाईल क्रमांकासह पत्रके छापून परिसरात वाटण्यात आली असून संशयितांचा वापर आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करीत आता नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे.

Related posts: