|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महिला आयोगाने जागेवरच 50 प्रकरणे सोडवले

महिला आयोगाने जागेवरच 50 प्रकरणे सोडवले 

जनसुनावणीव्दारे पती-पत्नींचा संसार जुळवला अन् पीडितेला दिला भक्कम आधार

महिला आयोगाचा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग यशस्वी

अनेक पीडित महिलांनी लावली सुनावणीला हजेरी

रत्नागिरी / प्रतिनिधी

महिला आयोग तुमच्या दारी या उपक्रमांतर्गत रत्नागिरीत प्रथमच सावरकर नाटय़गृहात केवळ महिलांसाठी जनसुनावणी पार पडली. आश्चर्याची बाब म्हणजे याठिकाणी अनेक महिलांना त्वरीत न्याय मिळवून देण्यात आला. ज्या महिलांना अद्यापही संबंधित प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही अशा खात्यांना त्वरीत चौकशीचेही आदेश महिला आयोग अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी दिल्या. यावेळी ताटातूट झालेल्या दोन पती-पत्नीचा संसार जुळवून देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या जनसुनावणीला सर्वाधिक प्रकरणे कौटुंबिक हिंसाचाराची दाखल झालेली होती.

समाजात अनेक पीडित महिला आहेत मात्र त्यांना न्याय मिळतोच असे नाही अशावेळी त्यांना महिला आयोगाकडे तक्रार द्यायची असते मात्र त्यांना मुंबईला येणे शक्य नसते त्यामुळे महिला आयोग तुमच्या दारी हा उपक्रम घेवून राज्याचे महिला आयोगाचीच कमिटी रत्नागिरीत दाखल झाली होती. गुरूवारी आयोजित सुनावणीला रत्नागिरी सिंधुदूर्गातून एकूण 50 प्रकरणे दाखल झालेली होती. आयत्यावेळी 35 प्रकरणे दाखल झाली आणि इतर 15 प्रकरणे महिला आयोगाकडून यापूर्वी दाखल झालेली होती. या 50 प्रकरणाची सुनावणी याचठिकाणी झाली. आलेल्या तक्रारदारांच्या शंकेचे समाधान होईल अशा पध्दतीने मार्गदर्शन सुनावणी कमिटीने केले.

अनेक गैरसमजातून पती-पत्नी संसार तुटताहेत ही बाब या सुनावणी दरम्यान प्रकर्षाने लक्षात आली. काही पती-पत्नी प्रकरणे अगदी शुल्लक कारणावरून ताटातूट झाल्याचीही बाब लक्षात आले, सासू-सासरे भांडतात, सून ऐकत नाही. जागेचे व्यवहारावरून मानसिक त्रास असे अनेक प्रकरणे आले होते. काहींनी सामज्यंसाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला तर काही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही प्रकरणे सखोल चौकशीसाठी त्या त्या विभागांकडे वर्ग करण्यात आले. काही प्रकरणे वर्षानुवर्षे तक्रार करून सुटत नव्हते ती प्रकरणे यावेळी त्वरीत मार्गी लागली ही प्रशासनाची अनास्थाही याठिकाणी महिला आयोगाला दिसून आली.

महिलांसाठीच आयोजित जनसुणावणीला मोठी गर्दी नाटय़गृहात झाली होती. दोन्ही बाजूकडचे पक्षकार याठिकाणी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाची बाजू नोंदवून कमिटीने योग्य निर्णय दिला. कमी वेळात अतिशय उत्तम कामगिरी महिला आयोगाने केल्याने या सुनावणीचे कौतुक रत्नागिरीकरांकडून झाले.

या जनसुनावणीमध्ये ग्रामीण भागातील पीडित महिलांचा सहभाग मोठा होता. या महिला यापूर्वी तक्रारीसाठी घराबाहेरच पडल्या नव्हत्या. मात्र राज्याच्या महिला आयोग अध्यक्षा स्वतः त्यांच्या कमिटीसह येणार असल्याचे वृत्त कळतांच जवळपास 25 ते 30 महिला थेट तक्रारी घेवून याठिकाणी आल्या होत्या. या प्रत्येक महिलांची चौकशी स्वतः महिला आयोग अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी केली.