|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नाला वळविल्याचा आरोप झालेल्या अपार्टमेन्टचे झाले सर्वेक्षण

नाला वळविल्याचा आरोप झालेल्या अपार्टमेन्टचे झाले सर्वेक्षण 

प्रतिनिधी /बेळगाव :

सेव्हन कंस्ट्रक्शन्स या नावाने जाधवनगर येथे उभारल्या जात असलेल्या अपार्टमेन्टच्या बांधकामासाठी नैसर्गिक  जलस्त्राsत असलेला नालाच वळविण्यात आल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत झाली होती. या तक्रारीची दखल घेवून या प्रकाराला परवानगी देणाऱया मनपा व बुडा यंत्रणांना सर्वेक्षणास हजर रहा, अशी नोटीस भूमापन खात्याच्या सहाय्यक संचालक कार्यालयाकडून बजाविण्यात आली होती. या आदेशानुसार गुरुवारी अपार्टमेन्टच्या ठिकाणी जाऊन आवश्यक ते सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान आपली बाजू योग्य असून तक्रारदारांनी संगनमताने ब्लॅकमेलींगचा प्रकार केला असल्याचा आरोप करून अपार्टमेंटच्या मालकांनी एका आरटीआय कार्यकर्त्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

गुरुवारी सकाळी भूमापन खाते, महानगरपालिका तसेच बुडाचे अधिकारी जाधवनगर येथे दाखल झाले होते. यावेळी अपार्टमेंटचे मालक असणारे फैजान सेठ, कैफ नुराणी यांना, तसेच तक्रारदार आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास एम. राव यांनाही पाचारण करण्यात आले होते. श्रीनिवास राव यांनी ही तक्रार मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेवून मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक आयुक्तांना या संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. प्रादेशिक आयुक्तांनी चौकशीचे आदेश बेळगावच्या जिल्हाधिकाऱयांना तर जिल्हाधिकाऱयांनी मनपा व बुडा आयुक्तांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याची सूचना केली होती.

गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला. तब्बल दीड तास अपार्टमेंटच्या चारही बाजूंनी पाहणी सुरू होती. यावेळी सीडीपी नकाशे, इतर उतारे आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित अधिकाऱयांनी आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पाहणी केली. तक्रारदारांनी सादर केलेल्या तक्रारीतील मुद्यानुसार आवश्यक त्या पडताळणीही यावेळी करण्यात आल्या. याला अपार्टमेंट मालकांकडूनही योग्य सहकार्य देण्यात आले होते.