|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कारिवडे, कोळपे, वाघेरीत ‘थरथराट’

कारिवडे, कोळपे, वाघेरीत ‘थरथराट’ 

वीज कोसळून तिघे जखमी : कारिवडेत कांबळी कुटुंबीय बालबाल बचावले

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :

  आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्गात पावसाचे पुनरागमन झाले आहे. जिल्हय़ाच्या सर्वच भागात गुरुवारी गडगडाटासह पाऊस कोसळला. हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा कायम असून जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन जिल्हावासियांना केले आहे. दरम्यान, वीज कोसळून वैभववाडी तालुक्यातील कोळपे येथे एक तरुण, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे एक विवाहिता, तर कणकवली तालुक्यातील वाघेरी येथे एक वृद्धा वीज अंगावर कोसळल्याने जखमी झाली. कारिवडेचे कांबळी कुटुंबीय तर बालबाल बचावले.

 जिल्हय़ात आतापर्यंत 2,471 मि. मी. च्या सरासरीने एकूण 19 हजार 775 मि. मी. एवढा पाऊस झाला आहे. मात्र जिल्हय़ाची वार्षिक सरासरी अद्याप पावसाने गाठलेली नाही. गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्यानंतर सातव्या दिवसापर्यंत एकसारखा पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने गेले आठ दिवस विश्रांती घेतली होती. गुरुवारी पावसाचे पुनरागमन झाले व गडगडाटासह पाऊस कोसळला. दरम्यान गडगडाटासह पाऊस यापुढेही कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हय़ाची पावसाची वार्षिक सरासरी 3200 ते 3400 मि. मी. आहे. परंतु पावसाने अद्याप वार्षिक सरासरी गाठलेली नसून पिछाडीवर आहे.

कोळपेत युवक जखमी

वैभववाडी : कोळपे-जमातवाडी येथे विजेचा लोळ अंगावर आल्याने शेषनाग दालचिनी चव्हाण (30, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. कोळपे) हा सेंट्रीग कामगार जखमी झाला. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची तब्येत सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तालुक्यात दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शेषनाग हा घरात काम करीत असताना विजेचा लोळ अंगावर आल्याने जखमी झाला. घटनेची माहिती समजताच नायब तहसीलदर आर. जी. गावित, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कारिवडेत कांबळी कुटुंबिय बालबाल बचावले

ओटवणे : कारिवडे परिसरात गुरुवारी दुपारी गडगडाटासह पाऊस सुरू असतानाच कारिवडे गवळीवाडीतील एका घरावर विजेचा लोळ कोसळला. घरातील कांबळी कुटुंबीय सुदैवानेच बचावले. विजेच्या लोळामुळे घराचे दोन चिरे कोसळून वीज मीटरसह घराचे संपूर्ण वायरिंग जळून गेले. विद्युत उपकरणेही निकामी झाली. विजेचा लोळ जवळून गेल्याने सौ. अन्नपूर्णा कांबळी या किरकोळ जखमी झाल्या.

कारिवडे गवळीवाडीत बाळा महादेव कांबळी यांचे घर आहे. बाळा गवळी सार्वजनिक बांधकाम खात्यात रस्ता कामगार आहेत. दुपारची वेळ असल्याने ते घरी होते. पत्नी सौ. अन्नपूर्णा घरातील कामे करीत होत्या. मुलगी मयुरी घरात झोपली होती, तर मुलगा महादेव शाळेत गेला होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्रचंड लखलखाट सुरू झाला अन् काही क्षणातच प्रचंड आवाजासह विजेचा लोळ कांबळी यांच्या वीज मीटरच्या बाजूने घरावर कोसळला. प्रचंड धक्क्यामुळे वीज मीटरवरील भिंतीमधील चिरेही खाली कोसळले.

उच्च दाबाची वीज मीटरमधून आल्याने घरातील वायरिंग साफ जळून संपूर्ण घरात धूर झाला. या घटनेने हादरलेल्या कांबळी यांनी तात्काळ घरात झोपलेल्या मुलीला उठवून सर्वांसह घराबाहेर येत आरडाओरड सुरू केली. लाडू कांबळी, लक्ष्मण भालेकर, भालचंद्र भारमल, बापू हनपाडे आदी शेजारील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी येऊन कांबळी कुटुंबियांना धीर दिला. या घटनेत विजेचा लोळ अगदी जवळून गेल्याने सौ. अन्नपूर्णा कांबळी यांच्या चेहऱयाला व हाताला किरकोळ दुखापत झाली.

या घटनेची माहिती लक्ष्मण भालेकर यांनी वायरमन सुधाकर गावडे यांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर तलाठी एस. ए. मुळीक, पोलीस पाटील प्रदीप केळुसकर, सुधीर माळकर यांनी पंचनामा केला. या घटनेत वीज मीटरसह घराचे संपूर्ण वायरिंग जळून खाक झाले असून घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे निकामी झाल्याने कांबळी कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे.

वाघेरीत वीज पडून वृद्धा जखमी

कणकवली : तालुक्यात गुरुवारी दुपारी 2.30 च्या सुमारास गडगडाटासह धुवाँधार पाऊस कोसळला. या पावसात वाघेरी-मठ खुर्द येथे विद्युत खांब पडून एका घराचे, तर वादळी पावसात अन्य दोन घरांचे नुकसान झाले. वाघेरी येथीलच श्रीमती हौसाबाई बर्गे (60) यांच्या अंगावर वीज पडून त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले. या वादळी पावसात मठ खुर्द येथील विजेचे तीन खांब पडल्याने मंगेश कृष्णा राणे यांच्या घराचे सुमारे 1400 रुपयांचे नुकसान झाले. मात्र, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मोठी दुर्घटना टळली. तेथीलच विष्णू धोंडू कदम यांच्या घराची भिंत पडल्याने 4700 रुपयांचे, महेश गंगाराम राणे, रामचंद्र बाळाराम सावंत, अरुण सावळाराम रावराणे, नामदेव रामचंद्र सावंत, विकास विष्णू सावंत यांचेही झाडाच्या फांद्या पडून नुकसान झाले. तलाठी दीपाली ठुकरुल या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात येत होता.