|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जयंती नटराजन यांच्यावर सीबीआयचा गुन्हा

जयंती नटराजन यांच्यावर सीबीआयचा गुन्हा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भ्रष्टाचारप्रकरणी माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्यावर शनिवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला. तसेच चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानावर छापाही टाकण्यात आला.

काँग्रेस नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये जुलै 2011 ते डिसेंबर 2013 या कालावधीमध्ये नटराजन पर्यावरण मंत्री होत्या. या काळात झारखंडमध्ये इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पास पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी देताना खाण उद्योग नियम, पर्यावरण संरक्षण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाची पायमल्ली केली. नटराजन यांनी पदाचा गैरवापर केला, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. या आरोपानंतर त्यांची पर्यावरण मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयकडे तीन
तक्रारी दाखल झाल्या होत्या.

नटराजन यांनी  इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेड कंपनीस वनविभागाकडे असणारी 55.79 हेक्टर जमीन मंजूर केली होती. त्यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी पर्यावरण मंत्रालयाने ती नाकारली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत नटराजन यांनी कंपीनस जमीन मंजूर केली. तसेच अन्य बाबींनाही परवानगी दिल्याचे सीबीआयने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेड कंपनीचे माजी संचालक उमंग केजरीवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

पर्यावरण मंत्रीपदावरून हटविल्यानंतर नटराजन यांनी 2015मध्ये काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानेच आपण कार्यवाही केल्याचा आरोप केला होता. तर नटाराजन यांचे आरोप भाजपच्या आदेशाने होत असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.

Related posts: