|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईच्या माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचे निधन

मुंबईच्या माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचे निधन 

प्रतिनिधी/ मुंबई, देवगड

मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका शैलजा विजय गिरकर (62) यांचे रविवारी रात्री 8 वा. च्या सुमारास कांदिवली येथील खासगी रुग्णालयात अल्प आजारावर उपचार सुरू असताना निधन झाले. माजी समाजकल्याण राज्यमंत्री तथा आमदार विजय ऊर्फ भाई गिरकर यांच्या त्या पत्नी होत.

शैलजा गिरकर या भाजपच्या कांदिवली प्रभागातील विद्यमान नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी काम केले होते. सतत 25 वर्षे त्या कांदिवली प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून येत होत्या. प्रचंड जनसंपर्क असल्याने गिरकर यांचा कांदिवली परिसरामध्ये चांगला
प्रभाव होता. प्रामाणिक कामकाजाच्या शैलीमुळे महापालिकेच्या विविध समित्यांवर अध्यक्षा म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली होती. भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्या म्हणूनही त्या ओळखल्या जात. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यामध्येही त्यांनी कामाचा वेगळा ठसा उमटविला होता. आमदार भाई गिरकर यांच्यासमवेत कांदिवली भागात पक्षाचे काम उत्तमरित्या त्या पार पाडत होत्या. राज्यातील भाजपच्या कार्यक्षेत्रातही गिरकर यांचा विशेष प्रभाव होता.

गिरकर यांचे माहेर देवगड तालुक्यातील मिठबाव (जि. सिंधुदुग) येथे तर सासर गिर्ये येथे आहे. गिर्ये गावातील विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. गिर्ये बौद्धजन विकास मंडळाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. गिरकर यांच्या दुःखद निधनाचे वृत्त समजताच विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांच्या मुंबई- कांदिवली येथील निवासस्थानी धाव घेतली. पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पार्थिवावर सोमवारी सकाळी मुंबई-कांदिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related posts: