|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भाजप आमदाराची पोलिसांना दमदाटी

भाजप आमदाराची पोलिसांना दमदाटी 

प्रतिनिधी/ मुंबई

राज्यातील भाजपचे आमदार एकामागोमाग एक वादाच्या भोवऱयात अडकत असताना मुंबईतील भाजपचे आमदार अमित साटम यांनी फेरीवाल्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अंधेरी (पश्चिम) येथील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी आमदार अमित साटम आणि पोलीस अधिकारी गेले होते. त्यावेळी साटम यांनी फेरीवाल्यांना शिवीगाळ करताना मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच पोलिसांना दमदाटी करताना फेरीवाल्यांवर तुम्ही कारवाई करत नसल्यामुळे मला कायदा हातात घ्यावा लागत असल्याचे साटम म्हणाल्याचे व्हिडिओत दिसते. मात्र, येथील फेरीवाल्यांनी अमित साटम हे हप्त्यांची मागणी करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार अमित साटम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या मतदारसंघात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन काही जणांचा मृत्यू झाला होता. या भागात फेरीवाले सिलिंडरचा वापर करून रस्त्यावरच खाण्याचे पदार्थ बनवून विकतात. याबाबत वारंवार पोलीस आणि पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. 7 सप्टेंबरला आपण पालिका अधिकारी आणि पोलिसांसोबत जाऊन कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र फेरीवाल्यांवर कोणती कारवाई करू नये यासाठी माझ्यावर अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून कारवाई करण्यापासून परावृत व्हावे यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र, आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे सांगत साटम यांनी आरोपाचे खंडन केले.

अमित साटम हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक होते. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी (प.) मतदारसंघातून माजी आमदार अशोक जाधव यांचा पराभव केला होता.