|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोन गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त

दोन गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त 

इंडी तालुक्यात कारवाई : चार संशयितांना अटक

वार्ताहर/ विजापूर

दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे जप्त केल्याची घडना इंडी तालुक्यातील नंद्राळ क्रॉसजवळ घडली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघा संशयितांना अटक केली आहे. इजाज बंदेनवाज पटेल उर्फ बिरादार (रा. नंद्राळ), रजनीकांत उर्फ लाल्या मरेप्पा गिरिणीवड्डर, महेश श्रीशेल क्षत्री (दोघेही रा. बरगुडी), सिद्दप्पा नागप्पा हत्तूर (रा. भतगुणकी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी, इंडी तालुक्यातील हलसंगीकडे जाणाऱया रस्त्यावर असलेल्या नंद्राळ क्रॉसजवळ काहीजण बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रs घेऊन  जाणार असल्याची माहिती रविवारी पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शिवकुमार गुणारे तसेच विजापूर व इंडी विभागाचे डीवायएसपी रविंद्र शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून सापळा रचण्यात आला.

रविवारी ठरल्याप्रमाणे चडचण पोलीस स्थानकाचे सीपीआय एम. बी. आसोडे, झळकी पोलीस स्थानकाचे पीएसआय सुरेश बेंडेगुंबळ व इतर पोलीस अधिकाऱयांनी हलसंगी क्रॉसजवळ सापळा रचला. याचवेळी केए 28/ए/ 4476 या क्रमांकाची एक कार येत असल्याचे पोलिसांना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी ही कार अडवून चौकशी केली. यावेळी इजाज, रजनीकांत, महेश व सिद्दप्पा यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या दाखवून कारची तपासणी करण्यात आली. कारमध्ये दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी वरील चारही संशयितांना अधिक चौकशीसाठी अटक केली. तसेच त्यांनी वापरलेली कार, पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी सर्वांवर झळकी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चारही जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या शस्त्रांबद्दल पोलीस अधिक तपास करीत असून जिल्हा पोलीसप्रमुख कुलदीपकुमार जैन यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले.