|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाच लाख रोख अन् विकासाची हमी

पाच लाख रोख अन् विकासाची हमी 

थेट सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी

चिपळुणात बडय़ा राजकीय पक्षाचे ‘पॅकेज’

ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी खटाटोप

प्रतिनिधी /चिपळूण

जिल्हय़ात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीला सुरूवात झाली असली तरी राजकीय पक्षांनी आपले लक्ष्य ‘थेट सरपंच’ निवडीवर केंद्रीत केले आहे. अधिकाधिक सरपंच निवडून गाव ताब्यात घेण्यासाठी एका बडय़ा राजकीय पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावासाठी पाच लाख रूपये आणि गावच्या विकासाची हमी असे पॅकेजज गाव, वाडी प्रमुखांना पक्षाकडून दिले असल्याचे वृत्त आहे. चिपळुण तालुक्यातील या पॅकेजने राजकीय पक्ष मात्र हडबडून गेले आहेत.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून समजल्या जाणाऱया ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आठवडाभरानंतर खऱया अर्थाने सुरू होत आहे. येत्या 14 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील मालदोली, बिवली, करंबवणे, केतकी, भिले, कापरे, ओमळी-पवारवाडी, नारदखेरकी, वहाळ, आबीटगांव, खांडोत्री, गुढे, डुगवे, ढाकमोली, गुळवणे, परशुराम, पेढे, खांदाटपाली, नवीन कोळकेवाडी, शिरवली, देवखेरकी, उमरोली, गोंधळे-मजरेकौंढर, बामणोली, असुर्डे, आंबतखोल, धामेली कोंड, कामथे, कामथे खुर्द, कळकवणे, गाणे, शिरगांव अशा 32 ग्रामपंचायती निवडणुकीला सामोरे जात आहेत. यावर्षी थेट सरपंचामुळे निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे.

जनतेतून थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने अन्य सदस्यांच्या निवडीला तितकेसे महत्व उरलेले नाही. यापूर्वी निवडून गेलेल्या सदस्यांमध्ये सरपंचपदासाठी वर्ष-सव्वा वर्षाची वाटणी होत असल्याने निवडून गेल्यानंतर पाच वर्षात सरपंच पदाचा टिळा लागणार याची खात्री असे. मात्र आता तसे होणार नसल्याने सर्वांचे लक्ष थेट सरपंच निवडीकडे लागले आहे. सरपंचासाठी अख्खा गाव मतदान करणार असल्याने त्यादृष्टीने गावातील वलयांकीत चेहऱयाला संधी मिळणार आहे. यातच गावातील एकूण परिस्थिती, समाजनिहाय मतदान याचा ठोकताळा बांधला जात असून अधिक असलेला समाज त्यादृष्टीने एकत्र येताना दिसत आहे. याचाच फायदा एका राजकीय पक्षाने घेतला असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.

तालुक्यात आपल्या राजकीय वर्चस्वाचा टक्का दाखवून देण्यासाठी सदर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱयांनी आपापल्या भागातील निवडणूक होत असलेल्या गावांत जाऊन सरपंच पदासाठी ‘फिल्डींग’ लावण्यास सुरूवात केली आहे. गावातील चार-पाच वाडय़ांच्या प्रमुखांना एकत्र आणून एकूण पाच लाख रूपये खर्चासाठी आणि गावच्या विकासाची जबाबदारी घेत असल्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. केवळ सरपंचपदासाठी हा प्रस्ताव असून सदस्य कोणीही निवडून गेले तरी चालतील असेही या प्रस्तावात मांडण्यात आले आहे. अर्थात या प्रस्तावाची माहिती गावांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाना दिल्यानंतर तेही हडबडून गेले आहेत.

दरम्यान, ही पध्दत चुकीची असली तरी विरोध कोणत्या बाजूने करणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राजकीय नेतेमंडळी स्वतःच्या निवडणुकीत जे काही करतात ते आता सरपंच निवडीत होणार असल्याने सरकारचा निर्णय नेमका कोणाच्या फायद्याचा ठरतो हे आगामी काळात दिसणार आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवरील एका जबाबदार लोकप्रतिनिधीने ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.