|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वाकरे फाटय़ानजीक गव्याचे दर्शन

वाकरे फाटय़ानजीक गव्याचे दर्शन 

प्रतिनिधी/ वाकरे

कोल्हापूर-गगनबावडा राज्यरस्त्यावर वाकरे फाटय़ाच्या पश्चिमेकडील शिवेच्या रस्त्यावरुन सरदार राऊसो माने (रा. वाकरे) यांच्या वळके माळ शेतात गव्याचे दर्शन दिसले. शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी पाठलाग केल्यानंतर हा गवा धनगर समाजाच्या खुपिरेतील शिवारात पळून गेला आहे. गव्याचा वनखात्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे : वाकरे येथील सरदार माने, राऊसो माने सकाळी 9 वाजता आपल्या शिवेवरील शेतात वैरण काढण्यासाठी गेले होते. यावेळी शीवेच्या रस्त्यावरुन खाली येणारा गवा त्यांच्या शेतात घुसल्याचे काही शेतकऱयांनी पाहिले. त्यांनी त्वरित याची माहिती सरदार सर्जेराव माने यांना दिली. याबाबत सरदार माने यांनी गावातील युवकांना माहिती दिली. गावातून रविंद्र पाटील (देवरे), सर्जेराव माने, शिवाजी बंडू पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह अन्य युवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ऊसातून माग काढत कुत्र्याला पुढे पाठवले. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे सुमारे 500 किलो वजनाचा महाकाय गवा कोल्हापूर टायर रिमोल्डींग वर्क्सजवळून बाहेर पडला. ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने हा गवा कोल्हापूर गगनबावडा राज्यरस्ता पार करून रस्त्यापलीकडील खुपिरे हद्दीतील धनगर समाजाच्या शिवारात पळून गेला. रस्त्यावरुन जात असताना सुदैवाने गव्याची एका दुचाकीस्वाराला बसणारी जोराची धडक वाचली, मात्र दुसरा दुचाकीस्वार दुचाकीवरुन बाजूला पडला. त्यापाठोपाठ अनेक वाहने रस्त्यावरुन गेली. मात्र दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला पडल्याने दुर्घटना घडली नाही. या घटनेची वार्ता परिसरात पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या परिसरात पहिल्यांदाच गवा आल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली असून दुर्घटना घडण्यापूर्वी वनखात्याने त्वरित या गव्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली मात्र सायंकाळपर्यंत वनखात्याच्या कोणत्याही अधिकाऱयाने घटनास्थळी भेट दिली नाही.

गव्याचा व्हिडीओ व्हायरल

या गव्याचा पाठलाग करताना गवा कोल्हापूर-गगनबावडा रस्ता पार करून एका दुचाकीस्वाराला धडकून पलीकडे गेल्याचे काही युवकांनी केलेल्या मोबाईल व्हिडीओ शुटींगमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ दिवसभर सोशल मिडीयावर व्हायरल होत होता.

या गव्याचा पाठलाग करणार प्रत्यक्षदर्शी शेतकरी सरदार राऊसो माने यांनी कुत्र्याच्या भुंकण्याने गवा बाहेर पडला. त्यामुळे कुत्र्यामुळेच सर्वांचे प्राण वाचल्याचे सांगितले.

Related posts: