|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कर्नाटकचे दुसरे साक्षीदारही निरुत्तर

कर्नाटकचे दुसरे साक्षीदारही निरुत्तर 

प्रतिनिधी/ पणजी

म्हादई जलतंटा लवादाला तिसऱयांदा मुदतवाढ मिळाल्यानंतर काल सोमवार दि. 11 सप्टेंबर 2017 पासून सुनावणी सुरु झाली. पहिल्याच दिवशी कर्नाटकाचे दुसरे साक्षीदार ए. के. बजाज निरुत्तर झाले. आजही त्यांची उलटतपासणी सुरु राहणार आहे.

कर्नाटकाचे पहिले साक्षीदार प्रा. ए. के. गोसाईन यांनी सादर केलेला अहवाल हा काल्पनिक व कुठलाच अभ्यास न करता कर्नाटकाच्या अधिकाऱयांनी तयार केला होता, असा आरोप गोव्याचे वकील आत्माराम नाडकर्णी यांनी केला होता. त्यासंबंधीचे पुरावेही सादर केले होते तसेच उलटतपासणीच्यावेळी त्यांनी प्रा. गेसाईन यांच्या तोंडून सदर अहवाल कर्नाटकाच्या अधिकाऱयांनी तयार केल्याचे वदवूनही घेतले होते. या साक्षीदाराची उलटतपासणी संपल्यानंतर आता ए. के. बजाज यांची उलटतपासणी सुरु झाली आहे. त्यांचाही अहवाल कुठलाच अभ्यास न करता व कर्नाटकाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या काल्पनिक आकडेवारीवरुन तयार केल्याचा आरोप ऍड. नाडकर्णी यांनी केला व उलटतपासणीवेळी ते आपण सिद्ध करणार असल्याचे त्यांनी लवादाला सांगितले.

साक्षीदार झाले निरूत्तर

कर्नाटकाचे साक्षीदार ए. के. बजाज हे केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी उलटतपासणीवेळी आपण मेकानिकल अभियंता असल्याचे सांगून हायड्रोलोजी या विषयाचे ज्ञान असले तरी त्यासंबंधी कधी अधिकृत शिक्षण घेतले नव्हते असे मान्य केले.

केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष असताना अहवालावर किंवा आयोगाच्या शिफारशीवर अध्यक्ष म्हणून त्यांची सही असायची पण तो अभ्यास त्यांनी केलेला नसायचा. तो अभ्यास जलतज्ञच करायचे असे त्यांनी उलटतपासणीच्यावेळी मान्य केले.

सी. डब्ल्यू. सी. अध्यक्ष म्हणून काम करताना आपणहून अभ्यास करून अहवाल तयार केला नाही, मग म्हादईप्रश्नी कसा काय अभ्यास करून अहवाल तयार केला? की हा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कुणा जलतज्ञाची मदत घेतली होती का, असा प्रश्न गोव्याच्या वतीने त्यांना करण्यात आला तेव्हा या प्रश्नावर काय उत्तर द्यायचे ते त्यांना सूचेना. ते निरूत्तर झाले.

म्हादई लांबीबात पुरावा सादर करा

गोव्याच्या माहितीप्रमाणे म्हादईची लांबी वेगळी आहे. 117 कि. मी. हा आकडा बजाज यांना कसा समजला असा परत प्रश्न त्यांना करण्यात आला. केंद्रीय जल आयोगाकडे म्हादईची लांबी किती आहे त्यांची नोंद आहे, मात्र तो आकडा 117 कि. मी. नाही. ए. के. बजाज यांनी सांगितलेली ही लांबी त्यांना कशी समजली हे लवादासमोर स्पष्ट होणे आवश्यक असल्याचा मुद्दा ऍड. नाकडर्णी यांनी मांडला. या प्रश्नाचे उत्तर सध्या आपल्याला आठवत नाही. उद्या त्यावर अभ्यास करतो आणि उत्तर देतो असे त्यांनी लवादाला सांगितले. त्यासंबंधीचा पुरावा मंगळवारी सादर करा, असा आदेश यावेळी लवादाने त्यांना दिला.

सकाळच्या सत्रात ऍड. नाडकर्णी सर्वोच्च न्यायालयात भारताचे अतिरिक्त सोलिसिटर जनरल म्हणून काम पाहत होते. त्यामुळे लवादासमोर उपस्थित राहू शकले नव्हते. संध्याकाळच्या सत्रात त्यांनी सुत्रे सांभाळली. सकाळी गोव्याचे ऍडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी धुरा सांभाळली. यावेळी ऍड. साल्वादोर रिबेलो, ऍड. अमोघ प्रभुदेसाई, ऍड. ओरबिन्दो गोम्स परेरा उपस्थित होते. गोव्याच्या जलस्रोत खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. ए. के. बजाज यांची उलटतपासणी आज मंगळवारीही पुढे चालू राहणार आहे.

Related posts: