|Tuesday, September 12, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नेदरलँड अंतराळ संशोधन संस्थेत सईची निवडनेदरलँड अंतराळ संशोधन संस्थेत सईची निवड 

  • स्पेस इंजिनिअरिंगमध्ये जर्मन विद्यापीठातही अव्वल ग्रेड
  • अंतराळ संशोधन करिअरमध्ये सईचे आणखी एक पाऊल

 

शेखर सामंत / सिंधुदुर्ग :

   जर्मन विद्यापीठात स्पेस इंजिनिअरिंगचा विशेष अभ्यास करणारी सिंधुदुर्गची सुकन्या निखिल उर्फ सई नामदेव मोरे हिने ‘मास्टर ऑफ सायन्स इन स्पेस इंजिनिअरिंग’ या पदव्युतर पदवी परीक्षेत विद्यापीठात उच्च श्रेणी प्राप्त केली असून हा निकाल बाहेर पडताच अवघ्या तासाभरातच नेदरलँड अंतराळ संस्थेने तिची आपल्या अंतराळ मिशनसाठी ‘स्पेस डिझायनिंग इंजिनिअर’ म्हणून निवड केल्याचे जाहीर केले आहे. सईच्या या निवडीने आता ती स्पेस साईंटिस्ट म्हणून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.

  ‘स्पेस मिशन’मध्ये करियर करायचा उद्देश समोर ठेवत लहानपणापासून स्पेस साईंटिस्ट होण्याचे स्वप्न बाळगणाऱया सईने जाणूनबुजून अभ्यासाकरिता स्पेस इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडले होते. त्यासाठी जर्मन विद्यापीठातून तिने इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडले होते. त्यासाठी जर्मन विद्यापीठातून तिने पदव्युत्तर पदवीसाठी ‘मास्टर ऑफ सायन्स इन स्पेस इंजिनिअरिंग’ हा विषय निवडला होता. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लीन विद्यापीठातून ती स्पेस इंजिनिअरिंगचे अध्ययन करीत होती. दोनच दिवसांपूर्वी या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून सईने विद्यापीठात सादर केलेल्या संशोधन प्रबंधाला उच्च श्रेणी प्राप्त झाल्याचे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यापीठाने तिचे विशेष अभिनंदन केले असून फेब्रुवारी 2018 मध्ये खास आयोजित दीक्षांत समारंभात तिला स्पेस इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे.

  दरम्यान, पदव्युत्तर पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळाल्याचे जाहीर होऊन साधारणपणे तास-दोन तास लोटतात, तोच नेदरलँड अंतराळ संस्थेने थेट सईशी संपर्क साधून तिची आपल्या अंतराळ संस्थेत (स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ऑफ नेदरलँड) स्पेस डिझायनिंग इंजिनिअर म्हणून निवड केल्याचे कळविले आहे. ‘इसा’ म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये संयुक्तपणे कार्य करणाऱया जर्मन स्पेस एजन्सी आणि फ्रान्स स्पेस एजन्सीसोबत नेदरलँड स्पेस एजन्सी मोलाचे योगदान देते. युरोपियन देशांमधील सर्वात प्रगत अंतराळ संस्था म्हणून या संस्थेचा लौकिक आहे. या निवडीमुळे सई आता नेदरलँड अंतराळ संस्थेतून खऱया अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पेस साईंटिस्ट म्हणून आपले करियर सुरू करणार आहे. या संस्थेत विविध स्पेस मिशनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी तिला प्राप्त होणार आहे.

सई ही वेंगुर्ले येथील डॉ. सौ. वसुधा व डॉ. नामदेव मोरे यांची कन्या. तिची यापूर्वीच युरोपियन स्पेस एजन्सीतर्फे 2020 ते 2030 या कालावधीत हाती घेण्यात येणाऱया मून व मास मिशनसाठी निवड झाली आहे. सई मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवीधर असून तिने फिजिक्समधून एम. एस्सी., तर आता बर्लिन विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच एम. एस. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सई ही नेदरलँड अंतराळ संस्थेत अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून काम करणारी कोकणातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

 

Related posts: