|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पूर्णगड समुद्रात चार मच्छीमार बुडाले

पूर्णगड समुद्रात चार मच्छीमार बुडाले 

मंगळवारी पहाटे 1.30 ची घटना

दोघांचे मृतदेह सापडले

दुर्घटनेत 3 सख्या भावांचा समावेश

खवळलेला समुद्र मच्छिमारांच्या जीवावर

वार्ताहर /रत्नागिरी-पावस

खराब वातावरण व उधाणलेल्या समुद्रात मासेमारीसाठी जाणे मच्छिमारांच्या जीवावर बेतले असून मंगळवारी पहाटे पूर्णगड समुद्रात छोटी मच्छीमार नौका (बलाव) उलटून चौघेजण समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत तीन सख्खे भाऊ व त्यांच्या एका सहकाऱयाचा समावेश आहे. यातील दोघांचे मृतदेह हाती लागले असून अद्यापही दोघेजण बेपत्ता आहेत. उर्वरीत दोघांचा शोध बुधवारी कोस्ट गार्डच्या मदतीने घेतला जाणार आहे.

पूर्णगड येथील जैनुद्दीन लतिफ पठाण (वय 45), हसन लतीफ पठाण (लय 65), अब्बास लतीफ पठाण (वय 42) या सख्ख्या भावांसह तवकर अब्दुल सत्तार बांगी (वय 32) हे चौघेजण समुद्रात बुडाले आहेत. यामध्ये हसन पठाण व जैनुद्दीन पठाण या दोघांचे मृतदेह शोधकार्यादरम्यान सापडले.

बुडालेली नौका ही जैनुद्दीन लतीफ पठाण यांच्या मालकीची आहे. जैनुद्दीन व त्यांचे बंधु हसन, अब्बास आणि तवक्कल अब्दुल सत्तार बांगी हे चौघेही 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. रात्री 1.30 ते 1.45 च्या दरम्यान समुद्रात बोटीच्या साह्याने मासेमारी करत होते.

पूर्णगड खाडी व समुद्र या दरम्यानच्या संगमावरील चॅनलमध्ये त्यांच्या नौकेला मोठय़ा लाटेचा जोरदार तडाखा बसला. लाटेच्या जोरदार तडाख्याने त्यांची नौका (बलाव) उलटली. त्यामुळे नौकेवरील चौघेही पाण्यात बुडाले. ही बाब आजूबाजूच्या नौकाधारकांना समजली होती. मात्र पाण्यात बुडालेल्यांच शोध घेण्यामध्ये खवळलेल्या समुद्राचा अडथळा निर्माण झाला. मात्र, अन्य मच्छीमारांनी कठीण परिस्थितीतही शोधकार्य राबवून हसन पठाण व जैनुद्दीन पठाण या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. अब्बास पठाण व तवक्कल अब्दुल सत्तार बाँगी यांचा शेध सुरूच आहे.

बुडालेल्या चौघांचे मंगळवारी सकाळी शोधकार्य सुरू झाले. त्यासाठी येथील सर्व यंत्रणाही स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने कामाला लागली. गावखडीचे रहिवासी वसंत नाटेकर यांनी समुद्रातील जैनुद्दीन पठाण यांचा मृतदेह शोधून काढला तर जयदीप तोडणकर व आबास बंदरकर यांनी समुद्रात बुडालेली बोट शोधून काढून किनाऱयावर आणली. सकाळपर्यंत दोन मृतदेह मिळाले होते. बाकी दोन मृतदेहांचा कसून शोध सायंकाळी उशिरापर्यंत घेण्यात येत होता. घटनास्थळी पोलीस बोट व कोस्ट गार्डच्या बोटीने तपास सुरू ठेवलेला आहे.

घटनास्थळी रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, मत्स्य विभागाचे अधिकारी व तहसीलदार मच्छिंद्र सुकटे व त्यांच्या सहकाऱयांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मदत कार्य सुरू केले. या पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पीएसआय एन. डी. उडे, पोलीस हवालदार पालांडे, पोलिस हवालदार व्ही जी गमरे, पोलिस नाईक आर अ.s कांबळे, पोलीस नाईक महेश गुरव व चालक पोलीस हवालदार सावंत व सा.पो.फौजदार कुबडे. घटनास्थळी उपस्थित होते. त्याठिकाणी शोधकार्य सुरूच ठेवलेले आहे. या घटनेमध्ये बुडालेल्या मात्र अजूनही न सापडलेल्या दोघांचा बुधवारी कोस्टगार्डच्या यंत्रणेमार्फत समुद्रात शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: