|Thursday, May 24, 2018
You are here: Home » क्रिडा » विराट वनडेत तर स्मिथ कसोटीत सर्वोत्तम

विराट वनडेत तर स्मिथ कसोटीत सर्वोत्तम 

नेतृत्वगुणात मात्र दोघेही सरस, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कचे प्रशंसोद्गार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विराट कोहली व स्टीव्ह स्मिथ नेतृत्वगुणात समसमान सर्वोत्तम आहेत. अर्थात, क्रिकेट प्रकाराच्या निकषावर विचार करता विराट कोहली वनडेत सर्वोत्तम आहे तर कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथ अधिक सरस ठरतो, अशा शब्दात या दिग्गज विद्यमान कर्णधारांची माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कने प्रशंसा केली. अर्थात, याचवेळी या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकेल, असा अंदाज त्याने वर्तवला.

‘नेतृत्वाच्या आघाडीवर दोघेही समसमान आहेत आणि त्यांच्यात सुधारणा होत आहे. प्रत्येक सामन्यागणिक ते अधिक प्रगल्भ होत आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघ जिंकत असल्याने विराट सरस असल्याचे जाणवते. पण, आपल्या धावा किती होत आहेत, यापेक्षा संघ सामने जिंकत आहे की नाही, ते महत्त्वाचे ठरते’, असे क्लार्क पुढे म्हणाला. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत टीव्ही एक्स्पर्टची भूमिका पार पाडण्यासाठी सध्या हा माजी कर्णधार भारतात दाखल झाला आहे. उभय संघातील या मालिकेला दि. 17 रोजी होणाऱया पहिल्या वनडे लढतीने सुरुवात होईल.

यंदा संपन्न झालेल्या चॅम्पियन्स चषकात ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी देखील गाठता आली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर, सध्याचा ऑस्ट्रेलियन संघ सर्वात दुबळा आहे का, या प्रश्नावर मात्र क्लार्कने सावध पवित्र्यावर भर दिला. ‘ऑस्ट्रेलियन संघाला आपल्या क्षमतेला न्याय देण्याची येथे उत्तम संधी असेल’, असे तो याप्रसंगी म्हणाला. सौरभ गांगुली व विराट कोहली या कर्णधारांची तुलना करण्याचा मोह देखील त्याला आवरता आला नाही. याबद्दल तो म्हणाला, ‘सध्या भारतीय संघ आक्रमक खेळावर जो भर देत आहे, त्याचे बरेचसे श्रेय सौरभ गांगुलीला द्यावे लागेल. गांगुली कधीही बॅकसीटवर बसणे पसंत करत नसे. पुढे, महेंद्रसिंग धोनी, अनिल कुंबळे व विराट कोहली यांनी तीच परंपरा जोमाने चालवली. विराट तरी आक्रमक कर्णधार असून त्याला हरणे कधीच पसंत असत नाही’.

मिशेल स्टार्क व जोश हॅझलवूड दुखापतीतून सावरत असल्याने या मालिकेत ते खेळणार नाहीत. त्यांची ऑस्ट्रेलियाला प्रकर्षाने उणीव जाणवेल, असा होरा क्लार्कने पुढे व्यक्त केला. ‘ऑस्ट्रेलियन संघ आक्रमक खेळावर भर देईल की त्याऐवजी बचावात्मक पवित्र्यावर भर देत पूर्ण 50 षटकांचा कोटा खेळून काढणे पसंत करेल, हे पाहावे लागेल. मात्र, 4-1 अशा फरकाने जिंकल्यास आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान होण्याची संधी त्यांच्याकडे असेल, हे विसरुन चालणार नाही’, याचा त्याने उल्लेख केला. ऑस्ट्रेलियाच्या विद्यमान संघातील बरेच खेळाडू आयपीएलमुळे भारतात खेळले असल्याने या अनुभवाचा त्यांना चांगलाच लाभ होईल, हे देखील त्याने स्पष्ट केले.

Related posts: