|Thursday, May 24, 2018
You are here: Home » क्रिडा » भारत दौऱयात ऑस्ट्रेलियाचा विजयी प्रारंभ

भारत दौऱयात ऑस्ट्रेलियाचा विजयी प्रारंभ 

एकमेव सराव सामन्यात बोर्ड इलेव्हनवर 103 धावांनी मात,

ऍगरचे 4 बळी, वॉर्नर, स्मिथ, हेड, स्टॉइनिस यांची अर्धशतके

वृत्तसंस्था/ चेन्नई

ऑस्ट्रेलियाने भारतीय दौऱयाची सुरुवात विजयाने केली असून येथे झालेल्या एकमेव सराव सामन्यात त्यांनी बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन संघाचा 103 धावांनी दणदणीत पराभव केला. येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. ऑस्ट्रेलियातर्फे ऍगरने 4 बळी मिळविले तर वॉर्नर, स्मिथ, हेड व स्टॉइनिस यांनी अर्धशतके झळकवली.

ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या 348 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना बोर्ड इलेव्हन संघाचा सलामीवीर राहुल त्रिपाठी (7) लवकर बाद झाल्यावर श्रीवत्स गोस्वामी (43) व मयंक अगरवाल (42) यांनी दुसऱया गडय़ासाठी 79 धावांची भागीदारी करून डाव सावरत आव्हान जिवंत ठेवले होते. पण ही जोडी बाद झाल्यानंतर नितिश राणा (19) व कर्णधार गुरकीरत मान (2 चौकार, एक षटकारासह 27) यांना भरीव योगदान देता न आल्याने त्यांचा डाव 3 बाद 102 वरून 8 बाद 156 असा गडगडला. कुशांग पटेल (48 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 41) व अक्षय कर्नेवर (2 चौकार, 4 षटकारांसह 28 चेंडूत 40) यांनी नवव्या गडय़ासाठी केवळ 59 चेंडूत 66 धावा फटकावल्याने अडीचशे धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांचा डाव 48.2 षटकांत 244 धावांत आटोपला. ऑस्टेलियातर्फे डावखुरा स्पिनर ऍश्टन ऍगरने 44 धावांत 4 बळी मिळविले. नाथन कोल्टर नाईलने बळी मिळविला नसला तरी त्याने अचूक मारा केला. त्याने 7 पैकी एक निर्धाव षटक टाकत केवळ 16 धावा दिल्या.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर निर्धारित 50 षटकांत 7 बाद 347 धावा फटकावल्या. कार्टराईट शून्यावर बाद झाल्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व कर्णधार स्मिथ यांनी बोर्ड इलेव्हन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवित अर्धशतके फटकावली. दोघांनी केवळ 87 चेंडूत 106 धावा फटकावल्या. मध्यमगती गोलंदाज कुलवंत खेजरोलिया व कुशांग पटेल यांच्यावर विशेष आक्रमण  करीत अनुक्रमे 30 व 32 धावा वसूल केल्या. ही जोडी मोठी भागीदारी उभारणार असे वाटत असतानाच कुशांग पटेलने वॉर्नरला यष्टिरक्षक श्रीवत्स गोस्वामीकरवी झेलबाद केले. वॉर्नरने 48 चेंडूत 11 चौकारांसह 64 धावा फटकावल्या. वॉशिंग्टन सुंदरने स्मिथ (68 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 55) व ग्लेन मॅक्सवेल (25 चेंडूत 14) यांचे बळी मिळविले.

वेडची तुफान फटकेबाजी

29 व्या षटकांत 4 बाद 158 अशी स्थिती असताना ट्रव्हिस हेड (5 चौकार, 1 षटकारासह 63 चेंडूत 65) व मार्कुस स्टॉइनिस (4 चौकार, 5 षटकारांसह 60 चेंडूत 76) यांनी जोरदार फटकेबाजी करून लक्ष वेधून घेतले. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी केवळ 70 चेंडूत 88 धावांची भर घालत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला. ही जोडी बाद झाल्यानंतरही ऑस्टेलियन फलंदाजांची फटकेबाजी सुरूच राहिली. मॅथ्यू वेडने (24 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 45) जोरदार फटकेबाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला शेवटच्या पाच षटकांत 68 धावांची भर घालता आली. बोर्ड इलेव्हनतर्फे कुशांग पटेल व सुंदर यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. अवेश खान, कर्नेवर व खेजरोलिया यांनी एकेक बळी मिळविला. भारत-ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना 17 रोजी चेन्नईत होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : ऑस्टेलिया 50 षटकांत 7 बाद 347 (वॉर्नर 48 चेंडूत 64, स्मिथ 68 चेंडूत 55, हेड 63 चेंडूत 65, स्टॉइनिस 60 चेंडूत 76, वेड 24 चेंडूत 45, मॅक्सवेल 25 चेंडूत 14, वॉशिंग्टन सुंदर 2-23, कुशांग पटेल 2-58, खेजरोलिया 1-37), बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन 48.2 षटकांत सर्व बाद 244 (श्रीवत्स गोस्वामी 43, मयंक अगरवाल 42, कुशांग पटेल नाबाद 41, अक्षय कर्नेवर 40, गुरकीरत मान 27, नितिश राणा 19, ऍगर 4-44, रिचर्डसन 2-36, स्टॉइनिस 1-13, झाम्पा 1-59, फॉकनर 1-35).

Related posts: