|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लक्षतीर्थ वसाहतीतील चोरी प्रकरणी महिलेस अटक, 2 लाखांचा ऐवज जप्त

लक्षतीर्थ वसाहतीतील चोरी प्रकरणी महिलेस अटक, 2 लाखांचा ऐवज जप्त 

लक्ष्मीपुरी पोलिसांची कामगिरी, हातांच्या ठशांवरून आरोपीचा सुगावा,

प्रतिनिधी/ कोल्हापूर

लक्षतीर्थ वसाहतीतील साई गल्लीतील इब्राहिम शेख यांच्या घरी झालेल्या दोन लाखांच्या चोरीप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित आसमॉ मुल्ला हिला अटक केली. तिने चोरीची कबुली दिली आहे. तिच्याकडून मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी चोरीतील दोन लाखांचा सोन्याचांदीचा ऐवज जप्त केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा, फिर्यादीने दिलेली माहिती आणि ठसे यावरून ही चोरी उघडकीस झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार उपस्थित होते. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत म्हणाले, लक्षतीर्थ वसाहतीतील साई गल्लीत इब्राहिम हुसेन शेख कुटुंबासह राहतात. त्यांनी 2 सप्टेंबरला दागिने आणून ते पत्नीकडे दिले होते. पत्नीने ते तिजोरीत ठेवले होते. हे दागिने ठेवताना शेजारच्या दोन, तीन महिलांनी पाहिले होते. त्यानंतर 3 सप्टेंबरला शेख यांच्या घरातून 9 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. 1 लाख 80 हजारांच्या चोरीची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली होती.

फिर्यादी शेख यांनी पोलिसांना दिलेली माहिती, मिळालेले ठसे पाहता ही चोरी सराईताने केलेली नव्हती, असे समोर आले. त्यामुळे परिसरात चौकशी करण्यात आली. घरातील कोणत्याही वस्तुला धक्का न लावता विशिष्ट ठिकाणी ठेवलेले दागिनेच चोरीला गेल्याने संशयित स्थानिक असावा, इथेपर्यत पोलीस पोहोचले. त्यातूनच गुन्हे अन्वेषण शाखा आणि महिला पथकाने संशयित आसमॉ मुल्ला हिच्यावर लक्ष ठेवले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने या चोरीची कबुली दिली.

संशयित आसमाँ मुल्ला हिच्याकडून शेख यांच्या घरातून चोरी झालेल्या दागिन्यांतील 50 हजारांचा नेकलेस, 30 हजारांच्या बांगडय़ा, 22 हजारांची चेन, 13 हजारांची अंगठी, 10 हजारांची अंगठी, 15 हजारांच्या लहान मुलांच्या अंगठय़ा, 15 हजारांचा करदोडा, 10 हजारांचे चांदीचे कडे, 1 हजार रूपयांच्या बिंदल्या, छल्ला, रोख 1 हजार रूपये जप्त केल्याची माहिती सावंत यांनी दिली.

 तपासासाठी पोलीस अधिक्षक संजय मोहिते, अपर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, शहर पोलीस उपाधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शन लाभले. सहायक पोलीस निरीक्षक संगीता पाटील, पोलीस उपनिरीक्षक डी. के. पवार, कर्मचारी अजीज शेख, नामदेव पाटील, अभिजित घाटगे, तानाजी गुरव, विनायक फराकटे, अजय वाडेकर, अभिजित व्हरांबळे, विजय देसाई, प्रशांत पाथरे, सुभाष चौगले यांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

चौकट

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडून 15 गुन्हे उघडकीस

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हा अन्वेषण शाखेने गेल्या आठ महिन्यांत 15 गुन्हे उघडकीस आणलें. त्यात 3 घरफोडय़ा, मोटारसायकली, मोबाईल चोरीच्या 12 गुन्ह्य़ांचा समावेश आहे. या गुन्हय़ांतून सुमारे 8 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. जप्त केलेला माल फिर्यादीना परत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी स्पष्ट केले.

चोरीची पद्धतच संशयिताला भोवली

संशयित आसमॉ मुल्ला हिने चोरी करताना घरातील कोणत्याही वस्तूला हात लावला नाही. तिने दागिने ठेवलेले ठिकाण पाहिले असल्याने तेथेंच तिने डल्ला मारला. त्यामुळे सराईतांप्रमाणे घरफोडी करताना ड्रॉवर फोडणे, तिजोरी फोडणे, घरातील वस्तू विस्कटणे आदी काहीही घडले. नाही. तसेच एकाच व्यक्तीचे एकाच ठिकाणी ठसे मिळाल्याने संशयितापर्यत आठ दिवसांत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

Related posts: