|Tuesday, September 12, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘फिफा’मुळे विद्यार्थी, शिक्षक दडपणाखाली‘फिफा’मुळे विद्यार्थी, शिक्षक दडपणाखाली 

शिक्षण खाते गप्प, सरकार सुस्त, विद्यार्थ्यांना धड टिफिनसुद्धा खायला मिळत नाही

प्रतिनिधी / मडगाव

फिफा वर्ल्ड कप फुटबॉलच्या आयोजनासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना शिक्षण खात्याने वेठीला धरले आहे. सद्या पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी अतिरिक्त वर्ग घेण्यास प्रारंभ केल्याने विद्यार्थ्यांच्या कोवळय़ा मनावर प्रचंड दडपण आले आहे. या गोंधळात विद्यार्थ्यांना धड टिफीन सुद्धा खाण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची माहिती हाती आली आहे. नियमित वेळापत्रकही कोलमडले आहे. एकंदरीत शिक्षण खात्याने घातलेल्या या गोंधळाचा पालकांनाही बराच त्रास होऊ लागला आहे.

गणेशचतुर्थीनंतर शाळा सुरू झाल्या त्या जणू विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वेठीला धरण्यासाठीच असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात निर्माण झाले आहे. प्राथमिक शाळा ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी सध्या मानसिक दडपणाखाली आहेत. शिक्षकांनीसुद्धा आपली भूमिका आता बदलली आहे. मुलांना अभ्यासक्रम ‘समजू देत अथवा न समजू देत’ पण कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

शिक्षण खात्याला काहीही पडलेले नाही?

असंख्य शिक्षक हे नेहमीच आपल्या पेशाशी प्रामाणिक राहिले. विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड राहिली. पण, सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांनी आपल्या भूमिकेत प्रचंड बदल केलाय, काही शिक्षकांचा कानोसा घेतला असता, त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही शिक्षण खात्याला वारंवार परीक्षेच्या वेळा पत्रकात बदल करावा अशी सूचना केलीय. पण, शिक्षण खात्याने काहीच काना मनावर घेतलेले नाही. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन केले जात असल्याची भूमिका शिक्षण खात्याने घेतल्याची माहिती शिक्षक वर्ग देत आहे.

परीक्षेसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होत नाही असे शिक्षकांचे तसेच मुख्याध्यापकांचे देखील म्हणणे आहे. जेव्हढा काही अभ्यासक्रम पूर्ण होईल, त्यावरच परीक्षा घेण्याचा निर्णय देखील शैक्षणिक संस्थांनी घेतला आहे. काही शैक्षणिक संस्थांनी अभ्यासक्रम गाळण्याचा देखील निर्णय घेतला आहे. आत्ता शिल्ल्क राहणारा अभ्यासक्रम पुढच्या परीक्षेत घेण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

Related posts: