|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ऍड. अमृत कासार यांच्यावर अंत्यसंस्कार

ऍड. अमृत कासार यांच्यावर अंत्यसंस्कार 

प्रतिनिधी/ पणजी

बहुजनांचे कैवारी ऍड. अमृत कासार यांच्या पार्थिवावर पणजी सांत ईनेज स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र ऍड. विवेक यांनी मंत्राग्नी दिला. स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत अनेकांनी आपली मते व्यक्त केली. अंत्ययात्रेच्यावेळी समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती उपस्थित होत्या. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वकिल साक्षीदारांचा समावेश होता. त्याचबरोबर हजारो कूळ आणि मुंडकार असलेल्या त्यांच्या अशिलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

 सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांना श्रद्धांजली देताना सांगितले की डिचोलीचे पुत्र असलेले ऍड. अमृत कासार डिचोलीतील तळागाळातील लोकांचे रंजल्या गांजल्याचे मार्गदर्शक व आधारस्तंभ होते. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणात भाग घेतला नाही, मात्र जनसामान्यांकडील संबंध कधीच तोडला नाही असे ते म्हणाले.

कासारांचा सल्ला महत्वाचा होता : खंवटे

पर्वरीचे आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यांनी ऍड. कासार आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते असे सांगितले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास सर्व पक्षाचे मतदार पाठिंबा देतील व एक सर्वपक्षीय उमेदवार म्हणून आपण विजयी होणार याचे भविष्य त्यांनी यापूर्वी व्यक्त केले होते. कुठलाही पेच प्रसंग असो त्यांचा सल्ला मौल्यवान होता असे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

बहुजनसमाजासाठी सतत कार्यरत असलेले ऍड. कासार पंचतत्वात विलीन झाल्याने एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. असे मत लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले.

मयेप्रश्नी लढत राहिले : शेट

माजी सभापती अनंत शेट यांनी श्रद्धांजली देताना मयेचा प्रश्न सोडवण्यास ऍड. कासार सदैव प्रयत्नशील होते. त्यांनी वेळोवेळी त्यासंबंधी मार्गदर्शन केले. हा लढा न्यायालयात कायद्याच्या चौकटीत राहून लढला जाऊ शकत नाही, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. कायद्यात दुरुस्ती हवी अशी मागणी त्यांनी केली होती. असे ते म्हणाले.

राजेंद्र आर्लेकर

माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले की मयेचा व देवस्थानचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या कायद्याला कोणत्या कलमात दुरुस्ती केल्यास तो कायमचा मिटू शकतो यावर ते जेव्हा जेव्हा भेट होई तेव्हा सूचना देत होते. गोवा मुक्त होऊन 56 वर्षे झाली तिसरी पिढी या भूमिवर चालू आहे. या पिढीच्या काळातच कूळ मुंडकार देवस्थान कोमुनिदाद व स्थलांतरितांच्या मालमत्तेचा प्रश्न सुटला पाहिजे. नाहीतर यापुढील पिढय़ा आजच्या पिढीला माफ करणार नाही असे ते सांगत असत, असे आर्लेकर यांनी पुढे सांगितले.

मार्गदर्शक हरवला : सतरकर

माजी सभापती विश्वास सतरकर यांनी श्रद्धांजली देताना ऍड. कासार आपले शिक्षक होते. दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर आणि आपण त्यांचे विश्वासू विद्यार्थी होते. संविधानावर चर्चा करायला व कुठल्याही सामाजिक प्रश्नावर खोलवर चर्चा करायला त्यांना फार आवडत असे. नेता बनण्यासाठीचे गुण विद्यार्थी दशेतच दिसायला हवेत, असे ते सांगत. त्यामुळे आम्ही विद्यार्थी आंदोलने आणि चळवळीनी सहभागी होत गेलो. दरवर्षी होणाऱया विधिकार दिनाच्या वेळी त्यांची नियमित भेट व्हायची. त्यावेळी त्यांचे मार्गदर्शन मिळायचे. आपण या मार्गदर्शनाला आता मुकणार असल्याचे ऍड. विश्वास सतरकर यांनी सांगितले.

वकिलांचे मार्गदर्शक होते : ऍड. लोटलीकर

माजी ऍडव्होकेट जनरल सरेश लोटलीकर ऍड. अमृत कासार यांच्याबद्दल सांगताना म्हणले की ते दोघेही कायदा महाविद्यालयात एकत्र शिकवत असत पण विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक म्हणून त्यांनाच जास्त मान असायचा. कुळ मुंडकार देवस्थान प्रश्नी सामान्य जनता आणि अशील त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचेच पण वकिल मंडळीही बिनधास्तपणे त्यांच्याशी संपर्क साधून सल्ले घ्यायचे व आपला खटला तयार करायचे. कुळ मुंडकार देवस्थान कोमुनिदाद आदी विषयावर गाढा अभ्यास असल्याने ते या विषयावर एक ऑथोरीटीच होती. जटील प्रश्नाचा अभ्यास करण्यापूर्वी अनेक वकील त्यांचा सल्ला आधी घ्यायचे असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या निधनाने सामान्यांचेच नव्हे तर वकिलांचेही नुकसान झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

निवृत्त न्या. आर.एम.एस खांडेपारकर

आपण वकील झालो तेव्हा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. डिचोलीत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून बसलो असता ते समोर आपल्या अशिलाची बाजू तेवढय़ातच विनम्रपणे मांडायचे. आपण माजी खासदार म्हणून त्यांनी कधी घमेंड मिरवली नाही. त्यांची बाजू मांडण्याच्या गोड शैलीमुळे ती ऐकावीशी वाटायची, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. एन. एस. खांडेपारकर यांनी व्यक्त केले.

पत्रकारांचे आधारस्तंभ होते : कामत

ऍड. अमृत कासार पत्रकारांचे आधारस्तंभ होते. कुठलीही राजकीय प्रेचप्रसंग उद्भला, घटनात्मक समस्या निर्माण झाली की प्रतिक्रियेसाठी पत्रकारांना सर्वात पहिले नाव ऍड. कासार यांचेच आठवायचे. ते वृत्तपत्रात लेखही निर्भिडपणे लिहायचे. ते त्यांचा पिंड पत्रकाराचा होता. कुठल्याही प्रश्नाकडे ते त्याच चौकस नजरेने पहायचे. पत्रकारांवर जेव्हा अवमानाचे खटले सादर व्हायचे तेव्हा ते विनामुल्य खटले लढायचे व त्यांना संकटमुक्त करायचे असे पत्रकार प्रकाश काम यांनी सांगितले. समाजातील सर्व स्तरातील लोक सर्व प्रकारचे विविध विचारसरणीचे लोक त्यांच्या निकट होते. पण त्यांनी स्वतःच्या विचाराकडे व भूमिकेकडे कधीच  तडजोड केली नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बहुजन समाजाचे नुकसान : तिवरेकर

कासार समाजासाठी ते नेहमी झटत पण आपण समाजापुरता बांधून न रहाता विशाल मनाचा झालो पाहिजे असे ते नेहमी सांगत होते. आपल्या परीने समाजबांधवांना मदत करीत त्वेष्टा ब्राह्मण कासार समाजाचे भूषण असलेले ऍड. अमृत कासार यांच्या निधनामुळे समाजाचेच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचे नुकसान झाल्याचे मत त्वष्ठा ब्राह्मण कासार समाजाचे प्रतिनिधी सुदेश तिवरेकर यांनी व्यक्त केले.

नामदेव नाईक

मडकईवासियांच्या हक्कासाठी लढणारे ऍड. अमृत कासार यांची स्तृती सदैव प्रेरणादाई ठरणार आहे. त्यामुळे मडकई गावात सदैव त्यांचा फलक उभा केला जाईल, असे नामदेव नाईक यांनी सांगितले. ग्रामिण माहिती हक्क अधिवेशन मडकईत भरवण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता या अधिवेशनानंतर प्रत्येक मडकई वासिय एन.जीओ सारखा वागू लागल्याचे ते म्हणाले. समानता मानणारी खरी व्यक्ती आपण पहिल्याचे त्यांनी सांगितले.

विनायक नाईक

माजी आमदार विनायक नाईक यांनी श्रद्धांजली वाहताना ऍड. कासार राजकारणात सक्रीय असायला हवे होते. राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत पण राजकारणापासून दूर ठेवत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ऍड. सुहास वळवईकर

सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला लाखो रुपये आकारले जातात. त्यामुळे बहुजन समाजाची बाजू मांडणारा कोण नव्हता. उच्चभ्रू वकील आपल्यातच साटेलोटे करायचे. अशावेळी गोव्यातील बहुजन समाजाचा सर्वोच्च न्यायालयातील पहिला वकील ऍड. अमृत कासार ठरले. त्यांची विद्वत्ता व मृदूपणा पाहून त्यांना खासदाराची उमेदवारी दिली. पक्षीय राजकारण विसरून समान्य बहुजन समाजाने त्यांना निवडून आणले, असे ऍड. वळवईकर यांनी सांगितले.

त्यांच्या अंत्यदर्शनावेळी न्या. नेल्सन ब्रिटो, तसेच अनेक वकील मंडळी व त्यांचे विद्यार्थी, अशील उपस्थित होते. लेखकांमध्ये पुंडलिक नाईक, डॉ. तानाजी हळर्णकर, एन. शिवदास, प्रकाश पाडगावकर, तुकाराम शेट, धर्मानंद वेर्णेकर, प्रकाशक प्रभाकर लेले, माजी आमदार बाबूसो गावकर, दामू नाईक, धर्मा चोडणकर, आमदार दिगंबर कामत, राजेश पाटणेकर, सुभाष नार्वेकर, निशाकांत शिंदे, नारायण राठवळ, स्वाती केरकर, हर्षदा केरकर, अजितसिंग राणे, महेश राणे, राजन घाटे, ऍड. गोपाळ तांबा, ऍड. आयरीश रॉड्रिग्स, ऍड. क्लियोफात फर्नांडिस, क्रिस्तोफर फोन्सेका, शांती फोन्सेका आदी उपस्थित होते.

ऍड. कासार सच्चा समाजसेवक होते : ढवळीकर

गोरगरिब जनतेचा आधार बनून राहिलेले मगोचे माजी खासदार ऍड. अमृत कासार यांच्या निधनाबद्दल साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. बहुजन समाजाला खऱया अर्थाने न्याय देणारा सच्चा समाजसेवक अशा शब्दात मंत्री ढवळीकर यांनी त्यांचे वर्णन केले.

ढवळीकर हे सध्या इंग्लडमध्ये असून ते म्हणाले की, आपण बाहेर असल्याने त्यांच्या नातेवाईकांना भेटू शकत नाही, परंतु आपण कासार यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. कासार यांनी नेहमीच बहुजन समाजाचे हित पाहिले. कूळ मुंडकार प्रकरणे उच्च न्यायालयात नेली. त्यासाठी गोरगरिबांकडून अत्यल्प मानधन घेतले. त्यांच्यासाठी ते न्यायालयात लढले व त्यांना न्याय मिळवून दिला. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम काकोडकर यांचा पराभव करून कासार उत्तर गोव्यातून विजयी झाले. मगो पक्षाचा एक खासदार काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.

निष्णात वकील, उत्तम लेखक, चांगला वक्ता, समाजसेवक, माजी खासदार असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज गोव्यातून हरपले आहे. भारतीय व गोमंतकीय असल्याचा सार्थ अभिमान त्यांना असायचा. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्या जाण्याने गोरगरिबांच्या कैवारीला गोवा मुकला आहे आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणे शक्य नाही असे मंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले.

Related posts: