|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पर्यायी मार्गाची माहिती द्या

पर्यायी मार्गाची माहिती द्या 

14 रोजी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्याचा नागरिकांच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी / बेळगाव

   ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हटवून नव्याने उभारणी करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. पर्यायी मार्गांसह पुलाच्या उभारणीची माहिती नागरिकांना द्यावी. या करिता बैठक आयोजित करण्याच्या मागणीचे निवेदन गुरुवार दि.14 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकाऱयांना देण्याचा निर्णय विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले.

  पर्यायी मार्ग उपलब्ध न करताच उड्डाणपूल उभारण्याची घिसाडघाई चालविली आहे. यामुळे शहापूर विभागासह परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी  शेतकरी संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना, मार्ग संस्था आणि माजी नगरसेवक संघटना आदांसह विविध संघटनांच्यावतीने मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.

    यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक करून पर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्यास मोठय़ा समस्या निर्माण होणार असल्याची माहिती दिली. उड्डाणपूल उभारणीस विरोध नाही, पण रस्ता बंद झाल्यास रुग्ण आणि महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात यावा, अशी सूचना माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी केली. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यास रस्त्यावर येऊ, असा इशारा मराठी भाषिक आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी मांडले. नागरिकांना वेठीस धरून विकासकामे राबविणे योग्य नसल्याने याबाबत केंद्र शासनाकडे आनलाईन तक्रारी करण्याचे आवाहन सुजित मुळगुंद यांनी केले.

   शिक्षणसंस्थांकडून अतिक्रमण

खानापूर रोड येथे सरकारी जागा असून काही शिक्षणसंस्थांनी अतिक्रमण केले आहे. त्या संस्थांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. पण हा रस्ता बंद केल्यास शहापूर, वडगाव परिसरातील नागरिकांना त्रास होणार आहे. यामुळे काँग्रेसरोडवरून पुलाची उभारणी करण्यात आल्यास सोयीचे होईल, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी मांडले. सध्या असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली असल्याने नवीन पूल बांधणे आवश्यक आहे. हा पूल व्हावा याकरिता पाठपुरावा करण्यात आला होता. निधीअभावी पुलाचे काम झाले नाही. पुलाची उभारणी करण्यास काहीच अडचण नाही, पण तांत्रिक बाबीची चाचपणी करून उभारणी करण्यात यावी, असे मत माजी नगरसेवक लतीफखान पठाण यानी व्यक्त केले. कपिलेश्वर रोड उड्डाणपुलाची उभारणी करूनही अडचणी जैसे थे आहेत.  धारवाड रोड येथील पुलाची  उभारणी करताना आजी आणि माजी आमदाराच्या मालमत्ता वाचविण्याची दक्षता घेतली असल्याचा आरोप लतीफखान पठाण यांनी केला. रस्त्याची कमतरता पडत आहे, पण नागरिकांना अडचण होणार नाही याची दक्षता न घेतल्यास पुलाचे बांधकाम बंद पाडावे लागेल असा मुद्दा माजी महापौर गोविंद राऊत यांनी मांडला.

 बैठका आयोजित करण्याऐवजी रेल्वे आणि महापालिकेच्या अधिकाऱयांकडून पुलाची माहिती घेणे आवश्यक असल्याचे ईश्वर मुचंडी यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱयाची भेट घेऊन पुलाच्या उभारणीची माहिती घेण्याची गरज आहे, याकरिता शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊ. यामधे महापौर-उपमहापौरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी केले. उभारण्यात येणाऱया पुलाच्या उभारणीची माहिती घेणे आवश्यक असल्याची सूचना माजी महापौर विजय मोरे यांनी केली. याठिकाणी मंगलकार्यालये असल्याने नियोजित विवाह सोहळय़ांना याचा फटका बसणार असल्याचे मत जगदीश पवार यांनी व्यक्त केले.

 चार संस्था पुढे येऊन पुलाची उभारणी करीत आहेत. प्रशासनाने सुचविलेले पर्यायी मार्ग चुकीचे आहेत. यामुळे गोवा, खानापूर रोड आणि शहापूर विभागातील लाखो नागरिकांची गैरसोय होणार आहे, यामुळे समिती स्थापन करून प्रशासनाकडे पाठपुरावा करू त्यानंतर आंदोलन करण्याची गरज असल्याचे माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांनी सांगितले.

 पुलाची उभारणी कशी होणार याची माहिती नसताना आंदोलन करणे योग्य नाही. यामुळे जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन पुलाच्या उभारणीची माहिती घेऊ यामुळे आपल्याला प्रशासनाकडून सहकार्य मिळेल. तसेच आंदोलन करताना तांत्रिक माहिती आवश्यक असल्याने संघटनेत अभियंत्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे मार्गदर्शन  ऍड. अशोक पोतदार यांनी केले. यावेळी मार्ग संस्थेचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी आभार मानले.

Related posts: