|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मीच पतीच्या डोक्यात दगड घातला!

मीच पतीच्या डोक्यात दगड घातला! 

वार्ताहर/ बेडकिहाळ

 येथील वाल्मिकी नगर परिसरातील सेंट्रिंग कामगार मिलन देवल घस्ती (वय 21) या युवकाचा 10 रोजी दुपारी 2 च्या सुमारास राहत्या घरी झोपलेल्या अवस्थेत डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या 24 तासात सदलगा पोलिसांनी घटनेचा उलगडा लावला. मीच पतीच्या डोक्यात दगड घातला असल्याची कबुली चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पत्नीने दिली आहे. दीपा घस्ती असे आरोपीचे नाव असून तिची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

 या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरुन गेले होते. चिकोडीचे डीवायएसपी बी. एस. अंगडी, सीपीआय मल्लनगौडा नायकर, सदलगा पोलीस स्टेशनचे फौजदार संगमेश दिडगीनहाळ यांनी घटनेचा उलगडा तत्काळ केल्याने पोलीस तपासाचे कौतुक होताना पत्नीच्या सदर कृत्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

सदर घटनेविषयी सदलगा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 10 रोजी दुपारी मिलन आपल्या घरी झोपला होता. त्यावेळी त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. त्याचा तपास करण्यासाठी चिकोडीचे डीवायएसपी बी. एस. अंगडी, सीपीआय मल्लनगौडा नायकर, सदलगा पोलीस स्टेशनचे फौजदार संगमेश दिडगीनहाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी पत्नी दीपा हिने आपण घराबाहेर गेल्याचे सांगून घटनेतून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करुन पाहणी करण्यात आली. त्यावेळी श्वानही घराभोवती फिरले. त्यानंतर दीपा हिच्या भोवतीच घुटमळले. त्यामुळे पोलिसांनी दीपा हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या अधिकच्या चौकशीत दीपा हिने आपणच खूनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

वारंवार होणारे वाद कारणीभूत

तिने दिलेल्या कबुलीत पती मिलन यांच्याशी आपले वारंवार भांडण होत होते. त्या त्रासाला कंटाळून आपण काही महिने माहेरी गेलो होतो. त्यानंतर पतीने आपणबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय कळविला होता. त्यावेळी वडिलांनी आपली समजूत काढून सासरी पाठविले. पण पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली होती. वारंवार होणारी भांडणे व शरीर सुख मिळत नसल्याने आपण पतीला संपविण्याचा कट रचला होता. 10 रोजी पती घरी झोपले होते. त्यावेळी सासू घरी नसल्याचे पाहून आपण घरासमोरील मोठा दगड त्यांच्या डोक्यात घातला असल्याचे सांगितले.

 दीपा हिच्यावर खुनी हल्ल्याप्रकरणी सदलगा पोलिसांनी स्वयंप्रेरीत गुन्हा 224/17, कलम 307 आयपीसी गुन्हा नोंद केला आहे. आरोपी दीपाला 12 रोजी सकाळी 8.30 वाजता बेडकिहाळ येथील बेरड गल्लीतील घटनास्थळी आणून डीवायएसपी बी. एस. अंगडी, सीपीआय मल्लनगौडा नायकर, फौजदार संगमेश दिडगीनहाळ, हेड कॉन्स्टेबल एस. एस. सारापूरे, एस. ए. धोडसे, एस. ए. जमकुरळी, आर. एस. पुजारी यांच्यासह पोलीस साहाय्यकांनी पंचनामा केला. त्यानंतर दीपाची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.

जखमी मिलन अद्याप कोमातच

जखमी मिलन यांच्या डोक्यात अधिक वजनदार दगड घालण्यात आल्याने मोठय़ाप्रमाणात रक्तस्राव झाला होता. घटनेनंतर त्यांना बेळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सध्या मिलन कोम्यात असून उपचार सुरु आहेत. या घटनेचा छडा लागल्याने दीपा यांच्या कृत्याबाबत परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घस्ती कुटुंबाला मदतीची गरज

जखमी मिलन हा आपल्या आईसोबत एका छोटय़ाशा घरात राहतो आहे. रोजंदारीवर काम करणारे घस्ती कुटुंब आहे. सदर घटनेत कर्ता पुरुषच जखमी झाल्याने घस्ती कुटुंबाची परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत बेळगाव येथील एका नामवंत हॉस्पीटलमध्ये मिलन याच्यावर उपचार सुरु असून शस्त्रक्रियेसाठी 5 लाख खर्च असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कुटुंबाला दानशूर व्यक्तींनी मदत करावी अशी चर्चा घटनास्थळी सुरु होती.

Related posts: