|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेतकऱयांचे आता ‘कर्जमाफी अभियान’

शेतकऱयांचे आता ‘कर्जमाफी अभियान’ 

बेळगाव / प्रतिनिधी

 संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी शेतकऱयांनी अनेकवेळा आंदोलन केले. मात्र, याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकऱयांनी आता संपूर्ण जिल्हय़ात कर्जमाफी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शेतकऱयाला याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्याची सुरूवात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.

शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. मात्र, सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. नुकसानभरपाई वेळेत दिली जात नाही. देण्यात आलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकऱयांचे संपूर्ण कर्ज माफ करणे गरजेचे होते, पण अजूनही सरकार निर्णय घेण्यास तयार नाही. मध्यंतरी करण्यात आलेली कर्जमाफी काही शेतकऱयांच्या फायद्याची ठरली. पण बहुसंख्य शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरसकट कर्जमाफी करणे गरजेचे होते.

राष्ट्रीयकृत बँका, विविध सहकारी सोसायटय़ांमधील कर्ज माफ करण्यात आले नाही. केवळ कृषी पत्तीन सोसायटय़ांमधून घेण्यात आलेले कर्ज माफ करण्यात आले आहे. पण यामुळे इतर शेतकऱयांवर अन्याय झाला आहे. काही मोजक्मयाच शेतकऱयांना कृषी पत्तीन सोसायटय़ा दरवर्षी कर्ज देतात. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांमधूनच कर्जाची उचल करतात. कृषी पत्तीन सोसायटय़ांमधून केवळ 25 ते 40 हजार रुपयांपर्यंतच कर्ज दिले जात आहे. त्यामुळे मोठय़ा कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडेच शेतकऱयांना हात पसरावे लागतात. त्यामुळे शेतकरी तेथूनच कर्जाची उचल करत आहे.

कर्जमाफी केवळ फुसका बार

राज्यातील 90 टक्के शेतकऱयांनी राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेतले आहे. त्यामुळे सरकारची कर्जमाफी हा केवळ फुसका बार ठरला आहे. तेव्हा संपूर्ण कर्ज माफीसाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय शेतकऱयांनी घेतला आहे. जिल्हय़ातील प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱयांना या आंदोलनाची माहिती दिली जाणार आहे. जोपर्यंत कर्जमाफी केली जाणार नाही, तोपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात प्रचार करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अडीच वर्षांपासून आंदोलन करूनदेखील सरकारने शेतकऱयांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे हे अभियान राबविण्यात येणार आहे. बेळगाव जिल्हय़ातून या अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. रयत संघटनेच्या नेतृत्त्वाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे. कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाला सुरूवात झाली आहे.   

 

Related posts: