|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरीविरोधी लढा अधिक तीव्र करणार

रिफायनरीविरोधी लढा अधिक तीव्र करणार 

प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्त आक्रमक

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला आक्षेप

14 गावांमध्ये शासनाविरोधात संतापाची लाट

‘प्रकल्प हटाव’च्या मागणीवर ठाम

प्रतिनिधी /राजापूर

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील ग्रीन रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीलाच प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आक्षेप घेतला असून ही बैठक व बैठकीतील निर्णय आपल्याला मान्य नाहीत. आमची एकमेव मागणी आहे व ती म्हणजे प्रकल्प रद्द झालाच पाहीजे अशी आक्रमक भुमिका प्रकल्पग्रस्त शेतकऱयांनी घेतली आहे. 9 सप्टेंबरच्या भव्य मोर्चाद्वारे ‘कोकणच्या मुळावर उठणारा हा विनाशकारी प्रकल्प रद्द करा’ ही एकमेव मागणी शेतकरी, बागायतदार व मच्छीमारांनी केली होती. मात्र, त्याकडे शासनाने सपशेल दुर्लक्षच केल्याने 14 गावांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रकल्प विरोधी लढा सुरूच राहील अशी भुमिका सामाजिक कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त अशोक वालम यांनी जाहीर केली आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील नाणारसह 14 गावांमध्ये रिफायनरी हा घातक प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाच्या विरोधासाठी स्थापन झालेल्या समित्यांनी वेळोवेळी आपल्या भुमिका बदलल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी, बागायतदार व मच्छीमारांनी एकत्र येत प्रकल्प हटावसाठी आंदोलन सुरू केले. 9 सप्टेंबर रोजी या 14 गावांसह प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष बाधित नसलेल्या कुंभवडेसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्हयातील काही गावातील ग्रामस्थ, शेतकरी व मच्छीमार या सर्वांनी एकत्र येत प्रकल्पाविरोधात राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात राजकाऱयांना जाणीवपूर्व बाजूला ठेवण्यात आले. तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱयांना निवेदन देतानाच ‘प्रकल्प रद्द करा’ याव्यतिरिक्त आमची कोणतीही मागणी प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकाऱयांनी 12 रोजी मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती दिली होती.

मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीशी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांचा कोणताही संबध नाही, तसेच बैठकीत सहभागी झालेल्या व्यक्ती या प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी नसून दलाल असल्याचे आम्ही अगोदरच स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकरी व मच्छीमारांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित लेकांना आश्वासनांच्या भरगच्च पॅकेजचे गाजर दाखवण्यात आले. संबंध नसलेल्या लोकांशी घेतलेल्या या बैठकीमुळे सर्वसामान्य शेतकरी व मच्छीमार बांधव मनोमन दुखावला गेला आहे मात्र, जनतेची दिशाभुल करण्याचा हा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. प्रकल्प रद्द करण्यासाठी यापुढे अधिक ताकदीने आंदोलन उभारले जाईल अशी माहिती वालम यांनी दिली.

मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या बैठकीचे वृत्त प्रसिध्द होताच बुधवारी 14 गावातील व मुंबईतील अनेक प्रकल्पग्रस्तांनी तरूण भारतच्या राजापूर व रत्नागिरी कार्यालयात फोन करून संतप्त भावना व्यक्त केल्या. 9 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला मोर्चा हा आमच्या काही मागण्या मान्य करण्यासाठी नव्हे तर केवळ व केवळ रिफायनरी प्रकल्पच रद्द करण्यासाठी काढण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री व या बैठकीला उपस्थित लोकप्रतिनिधी व मूठभर लोक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मूठभर लोकांचे समर्थन घेत शासन हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रकल्पाचे समर्थन करणाऱयांचा व शासनाचा डाव हाणून पाडू असा इशाराच अनेकांनी दिला आहे.

Related posts: