|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात बोलेरो पिकअप उलटून चालक ठार

चिपळुणात बोलेरो पिकअप उलटून चालक ठार 

मृत कुडाळचा, ताबा सुटल्याने झाला अपघात, क्लिनर बचावला

 

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील पावर हाऊस येथे बुधवारी मध्यरात्री 1.15 वाजता ताबा सुटून बोलेरो- पिकअप गाडी 20 फूट कोसळून चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने क्लिनर वाचला असून मृत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठार झालेला चालक कुडाळ- सिंधुदुर्ग मधील आहे.

संतोष जनार्दन कुंभार (30, आंबेरी- माणगाव, कुडाळ) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तो विशाल शंकर सावंत याच्यासह बोलेरो पिकअप गाडी घेऊन खेर्डी एमआयडिसीमध्ये साहित्य घेऊन आला होता. हे साहित्य उतरवून झाल्यानंतर हे दोघही हॉटेल वनश्री येथे जेवले व मध्यरात्री 1 वाजता कुडाळकडे जाण्यास निघाले. या दरम्यान त्यांनी गाडीत डिझेलही भरले.

मात्र परतीचा प्रवास करताना त्याचा वरील ठिकाणी गाडीवरील ताबा सुटला व गाडी थेट ओहळावरून तब्बल 20 फूट रस्त्याच्या कडेला उलटली. याचदरम्यान, संतोष याची मान स्टेअरिंगमध्ये अडकली होती. त्यामुळे त्यातून त्याला काढताना सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागली. काही तासानंतर त्याला बाहेर काढल्यावर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याला मृत घोषित केले. मात्र या अपघातात बदली म्हणून क्लिनर आलेला विशाल सुदैवाने वाचला.

अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक ए. जी. दाभोळकर, हे. कॉ. संजय शिवलकर, पांडुरंग पाटील, निनाद कांबळे आदींनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने मदतकार्य केले. या अपघाताची विशाल याने खबर दिली. मात्र संतोष याचाच हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची माहिती त्याच्या नातेवाईकांसह मालकाला देण्यात आली. त्यानुसार ते तात्काळ येथे आले. बुधवारी विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related posts: