|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिवसेना-भाजपला जोरदार धक्का

शिवसेना-भाजपला जोरदार धक्का 

‘नियोजन’च्या दोन्ही जागा काँग्रेसकडे : संध्या तेरसे, राजू बेग विजयी : युतीची मते फुटली

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :

  जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत दोन्ही जागांवर काँगेसने विजय मिळवत शिवसेना-भाजप युतीचा धुव्वा उडवला आहे. नगर परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे राजू बेग 29 मते मिळवत विजयी झाले. शिवसेनेच्या शुभांगी सुकी यांना 23 मते मिळाली. नगर पंचायत मतदारसंघातूनही काँग्रेसच्या संध्या तेरसे 45 मते मिळवत विजयी झाल्या. भाजपाच्या उषा आठल्ये यांना 39 मते मिळाली आहेत. नगर परिषद मतदारसंघात बहुमत नसतानाही काँग्रेसला दहा जादा मते मिळाली. त्यामुळे शिवसेना-भाजपची मते फुटल्याचे उघड झाले. जिल्हा नियोजन समितीवर काँग्रेसने बहुमत मिळवले असून एकूण 24 पैकी काँग्रेसचे 15, शिवसेनेचे सहा आणि भाजपचे तीन सदस्य निवडले गेले आहेत.

  जिल्हा नियोजन समितीवरील 24 सदस्य निवडीसाठी शासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जि. प. मतदारसंघातून निवडून द्यायच्या 21 जागा, नगर पंचायत मतदारसंघाच्या दोन आणि नगर परिषद मतदारसंघाची एक अशा 24 जागांसाठी 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना व भाजपने समझोता करीत 24 पैकी 22 जागा बिनविरोध केल्या. त्यामुळे जि. प. मतदारसंघातून निवडायच्या सर्व 21 जागा बिनविरोध करण्यात आल्या. काँग्रेसच्या 12, शिवसेनेच्या सहा आणि भाजपच्या तीन जागा बिनविरोध झाल्या. तर नगर पंचायत मतदारसंघाच्या दोनपैकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामध्ये काँग्रेसचाच सदस्य बिनविरोध झाला, मात्र नगर पंचायत मतदारसंघाची एक आणि नगर परिषद मतदारसंघाची एक या दोन्ही जागांवर समझोता न झाल्याने निवडणूक झाली. या दोन्ही जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते.

  निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, नायब तहसीलदार संतोष बांदेकर, बी. जी. रजपूत, जी. के. सावंत उपस्थित होते. मतमोजणीच्या वेळी निवडणूक रिंगणात असलेले चारही उमेदवार उपस्थित होते.

  मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रमानुसार मतदान झाले होते. त्याप्रमाणे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एकास-एक उमेदवार असल्याने पहिल्या फेरीतच अकरा वाजता निकाल लागला. दोन्ही जागांवर काँग्रेसने विजय मिळवल्याचे समजताच काँग्रेसच्या गोटात एकच जल्लोष करण्यात आला. शिवसेना-भाजपच्या गोटात मात्र सन्नाटा होता. नगर परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे राजू बेग यांना 52 पैकी 29, तर शिवसेनेच्या शुभांगी सुकी यांना 23 मते मिळाली. नगर पंचायत मतदारसंघातून काँग्रेसच्या संध्या तेरसे यांना 84 पैकी 45, तर भाजपच्या उषा आठल्ये यांना 39 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी निकाल जाहीर केल्यावर दोन्ही विजयी उमेदवारांनी सभागृहाबाहेर येत कार्यकर्त्यांना अभिवादन केले. यावेळी काँग्रेसच्या जि. प. सदस्या सावी लोके, कुडाळचे नगरसेवक सुनील बांदेकर, काँग्रेसचे देवगड तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, अनंतराज पाटकर उपस्थित होते. या निवडणुकीत सर्व मते वैध ठरली, एकही मत बाद झाले नाही.

काँग्रेसचा शिवसेना-भाजपला धक्का

   नगर परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 54 मतदार होते. त्यापैकी शिवसेना-भाजपकडे 31, काँग्रेसकडे 19, राष्ट्रवादीकडे तीन आणि अपक्ष एक असे मतदार होते. एकूण 54 पैकी 52 जणांनी मतदान केले. युतीच्या दोघांनी मतदान केले नाही. शिवसेना-भाजपकडे बहुमत होते. त्यामुळे युतीच्या उमेदवाराचे पारडे जड होते. परंतु प्रत्यक्षात मतदानामध्ये काँग्रेसच्या राजू बेग यांना काँग्रेसची 29 आणि 10 मते अधिक मिळून 39 मते मिळाली. त्यामध्ये राष्ट्रवादीची तीन व अपक्ष एक अशी चार मते आणि शिवसेना-भाजपची सहा मते मिळाल्याने शिवसेना उमेदवारास पराभवाला सामोरे जावे लागले.

  नगर पंचायत मतदारसंघ निवडणुकीत मात्र मतांची फाटाफूट न होता काँग्रेसची 45 मते काँग्रेसलाच मिळाली. शिवसेना-भाजप युतीला 37 व राष्ट्रवादीचे एक आणि मनसेचे एक मिळून एकूण 39 मते मिळाली. नगर परिषदेमध्ये काँग्रेसला मदत करणाऱया राष्ट्रवादीने नगर पंचायतीमध्ये मात्र युतीला मदत केली.

राणेंच्या विचारांचा विजय – बेग, तेरसे            

 काँग्रेसचे विजयी उमेदवार राजू बेग व संध्या तेरसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमचा विजय म्हणजे नारायण राणे यांच्या विचारांचा विजय आहे. बहुमत नसतानाही काँग्रेसचा विजय झाला. आमदार नीतेश राणे यांनी फार मेहनत घेतली होती. त्यामुळे विजय मिळवता आला. जिल्हय़ात नारायण राणेंशिवाय पर्याय नाही, हेही स्पष्ट झाले, असेही ते म्हणाले.

नियोजन समितीवर काँग्रेसचे बहुमत

  जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री आहेत. पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले एक आमदार म्हणजे वैभव नाईक सदस्य आहेत. जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत हय़ा पदसिद्ध जि. प. अध्यक्षा म्हणून सदस्या आहेत. राज्यपालांकडून एक सदस्य नियुक्त केला जातो. परंतु त्याची अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या तीनपैकी शिवसेनेचे दोन व काँग्रेसचा एक सदस्य आहे. तर 24 सदस्यांपैकी 15 काँग्रेसचे, शिवसेनेचे सहा आणि भाजपचे तीन सदस्य आहेत. एकूण बलाबल पाहता पदसिद्ध जि. प. अध्यक्षांसह सर्वाधिक 16 सदस्य काँग्रेसचे आहेत. त्यामुळे नियोजन समितीवर काँग्रेसने बहुमत मिळवले आहे.

Related posts: