|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार-ट्रक अपघातात 10 ठार

कार-ट्रक अपघातात 10 ठार 

वार्ताहर/ रायबाग, कारवार

कुके सुब्रमण्यम येथे देवदर्शन करून रायबागच्या दिशेने परत येणाऱया भाविकांवर काळाने घाला घातला. हुबळी-अंकोला रोडवरील यल्लापूर, जि. कारवार येथे झायलो कार व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत कारमधील 10 जण ठार झाले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान घडली. मृतांमध्ये तीन बालके, चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

विवेक वसंत घाटगे (वय 37), सचिन सदाशिव झंडण्णवर (वय 31), चालक मुजाहिद इकबाल नाईकवाडी (वय 35), मेनका विवेक घाटगे (वय 32), गौरव्वा म्हेत्री (वय 58), वैष्णवी विवेक घाटगे (वय 5), वर्धराज विवेक घाटगे (वय दीड वर्षे), रेणुका चंद्रकांत कांबळे (वय 35), अभिनव चंद्रकांत कांबळे (वय 2, सर्वजण रा. रेल्वे स्टेशन, रायबाग) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. तर गजानन बापू म्हेत्री (वय 36, रा. रायबाग रेल्वे स्टेशन) हा गंभीर जखमी होता. त्याला हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा सायंकाळी मृत्यू झाला. मृतामधील विवेक घाटगे हे व्यावसायिक, रेणुका कांबळे या माध्यमिक विद्यालयात शिक्षिका तर गजानन म्हेत्री हे शेतकरी होते.

घटनेविषयी अधिक माहिती अशी, रायबाग स्टेशन येथील घाटगे कुटुंबीय सोमवारी सकाळी झायलो कारने (वाहन क्र. केए 23 एम 9086) कुके सुब्रमण्यम येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून दर्शन घेऊन बुधवारी सकाळी पुन्हा रायबागच्या दिशेने निघाले होते. सकाळी 8.30 च्या दरम्यान यल्लापूर येथे हुबळी-अंकोला रोडवर कार आली असता चालक मुजाहिद नाईकवाडी याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारची समोरून येणाऱया ट्रकला जोरदार धडक बसली. हा ट्रक यल्लापूरहून अंकोल्याकडे निघाला होता. सदर धडकेमुळे वाहनातील नऊजण जागीच ठार झाले. तर गजानन म्हेत्री हे गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ हुबळी येथील किम्स दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी त्याचाही मृत्यू झाला. अपघातात कारचा दर्शनी भाग पूर्णपणे ट्रकमध्ये घुसला होता.

सदर घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होते. त्यातील काही नागरिकांनी तत्काळ वाहनातून मृतदेह रस्त्यावर काढून ठेवले होते. उपस्थितांनी तत्काळ सदर घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना कळविली. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.

रुग्णावाहिकेला बोलावले पण…

अपघाताची भीषणता ओळखून ताबडतोब 108 रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले. या अपघातात किमान एकतरी जीव वाचेल या आशेने नागरिकांनी प्रयत्न केले. परंतु या अपघातात घटनास्थळीच नऊजणांचा बळी गेला होता. तर एकजण बचावण्याची आशा होती. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 वाहनांचे मोठे नुकसान

कार व ट्रकची भरधाव वेगाने धडक बसल्यामुळे दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. जोरदार धडकेमुळे वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत होऊन मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. वाहनातील बालकांचे मृतदेह बाहेर काढताच अनेकांना अश्रू अनावर झाले.

या अपघाताची माहिती समजताच कारवार जिल्हा पोलीसप्रमुख विनायक पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख गोपाळ बॅकोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. इतर सहकारी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच शवविच्छेदन करून सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटणारा

देवदर्शनाला गेलेले दहाजण ठार झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. घटनेची माहिती मृत विवेक घाटगे यांचे वडील वसंत घाटगे यांना समजली. त्यांनी घटनास्थळी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. सदर घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती रायबाग परिसरात पसरताच स्टेशन मार्गावरील सर्व व्यावसायिकांनी व्यवहार बंद करुन आदरांजली वाहिली. अपघातातील मृत घाटगे कुटुंबीय हे रायबागचे माजी आमदार घाटगे याचे नातेवाईक आहेत.

निष्काळजीपणा बेतला जीवावर

 वाहनचालकांनी नियोजित ठिकाणी सुखरुप पोहचावे यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. असे असताना त्याकडे कारचालकाने दुर्लक्ष केल्याने वाहनातील सर्व प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले. गडबडीत चालविली जाणारी वाहने आपल्यास अन्य लोकांचेही प्राण हिरावून घेऊ शकतात. याचे भान सर्वच वाहनधारकांनी ठेवण्याची गरज असल्याची चर्चा घटनास्थळी होत होती.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनचा उपयोग

स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती मिळताच मृतदेह काढण्यासाठी मदत केली. मात्र कारच्या समोर बसलेल्यांचा चिरडून मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढणे अशक्य झाले होते. यासाठी यल्लापूरहून क्रेन मागविण्यात आली होती. याच्या मदतीने गाडी बाजूला करून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातातील ट्रक हा कलादगी येथील आहे. सचिन झंडण्णवर याच्या पश्चात पत्नी व दीड वर्षाचा मुलगा आहे.

Related posts: