|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘इंटरनेट’ उपलब्धतेपर्यंत ऑनलाईन कामे बंद!

‘इंटरनेट’ उपलब्धतेपर्यंत ऑनलाईन कामे बंद! 

प्रतिनिधी / मालवण :

शैक्षणिक महाराष्ट्र व डिजिटल इंडियाच्या नावाने कोणत्याही सोयी-सुविधा न पुरवता शाळांना सर्व प्रकारची माहिती ऑनलाईन भरण्याबाबत शिक्षकांना सक्ती केली केली जात आहे. संगणक व इंटरनेट सुविधा शासनामार्फत उपलब्ध होईपर्यंत ऑनलाईन करायची कामे तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांना दिले आहे.

यावेळी राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष मंगेश कांबळी, सचिव राजेंद्र कडुलकर, अखिल मालवण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विद्याधर पाटील, सचिव अमर वाघमारे, पदवीधर शिक्षक संघटनेचे अनिल खडपकर, प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव जावेद शेख, नितीन कदम, प्रशांत पारकर, चंद्रसेन पाताडे, सुभाष नाटेकर, परमानंद वेंगुर्लेकर, राजेंद्रप्रसाद लाड आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे, सर्व प्रकारची माहिती ऑनलाईन भरण्याची सक्ती शिक्षकांवर केली जात आहे. त्यातून शिक्षकांची आर्थिक पिळवणूक व मानसिक खच्चीकरण केले जात आहे. तसेच व्हॉटसऍपच्या माध्यमातून वेळी अवेळी शासन निर्णय तद्नुषंगिक माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचवून ती तातडीने पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शिक्षकांचे अध्यापनाचे मुख्य काम बाजूला राहून शिक्षक या कामांमध्ये व्यस्त राहू लागला आहे. त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी सर्व प्रकारच्या प्रशासकीय व्हॉटसऍप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सरल प्रणाली अंतर्गत शाळा, शिक्षक, विद्यार्थी, बदल्या व मध्यान्ह योजनासंबंधी माहिती न भरणे, ऑनलाईन भरल्या जाणाऱया शिष्यवृत्त्या (समाजकल्याण, अल्पसंख्याक व इतर) न भरणे, शालेय पोषण आहार अंतर्गत धान्यादी माल संपल्यानंतर प्रशासनाकडून धान्यादी माल मिळेपर्यंत न शिजवणे, कोणतीही ऑनलाईन कामे न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

Related posts: