|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रधानमंत्री पुरस्कारासंबंधी सरकारी अधिकाऱयांत जागृती

प्रधानमंत्री पुरस्कारासंबंधी सरकारी अधिकाऱयांत जागृती 

प्रतिनिधी /पणजी :

चांगले प्रशासन देणाऱया अधिकाऱयाला प्रधानमंत्री पुरस्कार देण्यासाठी जागृती म्हणून 26 राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांची परिषद दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर गोवा मध्ये सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजना योग्य पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवणाऱया सरकारी कर्मचाऱयाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. केंद्रीय प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रारी निवारण मंत्रालयाचे केंद्रीय सचिव सी. विश्वनाथ यांनी या परिषदेचे उद्घाटन केले.

गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, गोवा सार्वजनिक प्रशासन व ग्रामीण विकास संस्थेचे महासंचालक मॅथ्यू सॅम्युएल, केंद्र सरकारच्या यु.आर.डीचे सचिव पी. ए. रेड्डी, संयुक्त सचिव स्मिता कुमार व डी.आर.डी.ओच्या संचालक अल्पना राव यावेळी उपस्थित होत्या. शुक्रवारी सकाळी होणाऱया समारोप सोहळ्य़ाला केंद्रीय रोजगार तथा निवृत्ती वेतन आणि अणूऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहाणार आहेत.

पंतप्रधानांच्या विविध योजना

पंतप्रधानांनी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यात पंतप्रधान फसल विमा योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, डिजिटल भूगतान योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान सौरउर्जा कंदील योजना तसेच इतर योजना जनतेपर्यंत योग्यपद्धतीने पोहोचविणाऱया सरकारी अधिकाऱयाला पंतप्रधान पुरस्कार मिळणार असल्याचे केंद्रीय सचिव सी. विश्वनाथ यांनी उपस्थित अधिकाऱयांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या पुरस्कारासाठी राज्यांचे चार गट करण्यात आले आहेत. त्यात पूर्वांचलाचा एक गट, केंद्रशासित प्रदेश दुसरा गट, उत्तर भारतातील तिसरा तर मध्य आणि दक्षिण भारतातील राज्यांचा चौथा गट असून या चौथ्या विभागातील 26 राज्यांसाठी ही परिषद होती. प्रत्येक राज्यातील दोन वरिष्ठ अधिकारी या परिषदेत उपस्थित असून ते आपल्या राज्यात परतल्यानंतर सदर पंतप्रधान पुरस्काराची माहिती सर्व कर्मचाऱयांना देणार आहे.

Related posts: