|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केंद्र सरकारचा सोशल मीडिया निव्वळ फार्स

केंद्र सरकारचा सोशल मीडिया निव्वळ फार्स 

प्रतिनिधी/ संकेश्वर

केंद्र सरकार राबवित असलेल्या सर्व योजना काँग्रेस पक्षाचे सरकार केंद्रात असतानाच्या आहेत. त्यावेळी विरोध करणाऱया मोदींनी त्याच योजना अंमलात आणून आपण भरपूर असे काही करत असल्याचा कांगावा करीत आहेत. योजना अंमलात येण्यापूर्वीच फुकटची प्रसिद्धी घेणाऱया केंद्र सरकारचा सोशल मीडिया हा निव्वळ फार्स असल्याची टीका अ. भा. काँग्रेस पक्षाचे सचिव सतीश जारकीहोळी यांनी केली.

शुक्रवारी येथील नेसरी गार्डनच्या सभागृहात आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या बुथ पदाधिकाऱयांच्या बैठकीत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री ए. बी. पाटील हे होते. स्वच्छ भारत, जीएसटी, नोटाबंदी व स्मार्ट सिटी या सर्व योजना काँग्रेसनेच प्रकाशात आणल्या आहेत. स्मार्ट सिटीची घोषणा 3 वर्षापूर्वीच झाली होती. पण बेळगावचा अद्यापही स्मार्ट सिटीचा चेहरा दिसत नाही. दुय्यम दर्जाच्या स्वयंपाकी गॅसचे वितरण होत आहे. तथापि, केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे विफल झाले आहे, असेही जारकीहोळी यांनी सांगितले.

काँग्रेसकडून 80 टक्के आश्वासनांची पूर्तता

राज्यातील काँग्रेसप्रणित सिद्धरामय्या सरकारने अवघ्या 4 वर्षांच्या काळात भरीव अशा योजना अंमलात आणल्या. निवडणुकीवेळी जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेली आश्वासने 80 टक्के पूर्ण केली आहेत. तेव्हा बुथच्या पदाधिकाऱयांनी मतदारसंघातील प्रत्येक घर पिंजून काढून काँग्रेस सरकारच्या योजनांची माहिती देत काँग्रेसमय परिवर्तन करा. तरच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमतानी सत्तेवर येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी संकेश्वर व हुक्केरी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने अ. भा. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, सचिव सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केपीसीसी सचिव टी. ईश्वर, लक्ष्मण चिंगळे, रवी कराळे, जयप्रकाश नलवडे, गंगाधर मुडशी, अशोक अंकलगी व श्रीकांत मुशी हे उपस्थित होते.

भूकमुक्त कर्नाटक

अखंड देशात भूकमुक्त राज्य करण्याचा प्रयत्न काँग्रेसप्रणित सिद्धरामय्या सरकार करीत आहे. शेतीला पाणी मिळावे या उद्देशाने तलाव भरणी योजना, बंधारे निर्माण, पिण्यासाठी शुद्ध पाणी व मोफत आहारधान्य देण्याची योजना एकमेव अशा कर्नाटकात राबविली जात आहे. हे कार्य पटवून देण्याचे कार्य प्रत्येक बुथ पदाधिकाऱयाने करावे, असे आवाहन ज्ये÷ नेते बी. आर. संगापगोळ यांनी केले.

कत्ती बंधूंनी एकाच व्यासपीठावर यावे

हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील पाणी योजना ब्रिजकम बंधारे, तलाव भरणी योजना सरकारी दरबारातून मंजूर करून आणल्या. आपण केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. तशी कागदपत्रे गेली 30 वर्षे आमदार असणाऱया नेत्यांकडे असल्यास त्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पटवून देण्याचे काम करावे, असे आव्हान यावेळी माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी दिले.

या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच बुथ पदाधिकाऱयांना यावेळी टी. ईश्वर यांनी प्रचारतंत्राचे प्रशिक्षण दिले. या बैठकीला हुक्केरी मतदारसंघातून मोठय़ा संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: