|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हास्तरावर 48 शाळांना मिळणार पुरस्कार

जिल्हास्तरावर 48 शाळांना मिळणार पुरस्कार 

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर ही अंतिम तारीख

वेबसाईट, मोबाईल ऍपच्या माध्यमातून नामनिर्देशनाची संधी

चंद्रशेखर देसाई / कणकवली :

शासनाकडून सर्व शाळांसाठी 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. गतवर्षी राज्यातील 15 शाळांना राष्ट्रीयस्तरावर स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाला होता. 2017-18 साठी राज्य पातळीवर 40 व जिल्हा पातळीवरील 48 शाळांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रश्नावलीसाठी केंद्र शासनाकडून ‘एमएचआरडी’ या वेबसाईटवर तसेच स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ऍपच्या माध्यमातून नामनिर्देशन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरही उत्तम कामगिरी करणाऱया शाळांचा गौरव करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी पाच क्षेत्रे निश्चित केली आहेत. यात पाण्याची उपलब्धता, शौचालय व स्वच्छतागृह व हात धुण्यासाठी व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक बदल व क्षमता विकास यांचा समावेश आहे. या पाच क्षेत्रांमध्ये एकूण 39 घटक निश्चित केले असून त्यानुसार शाळांना प्राप्त होणाऱया गुणांवर श्रेणी देण्यात येणार आहे.

स्टारची श्रेणी

या निकषानुसार 90 ते 100 टक्के गुण असणाऱयांना अत्युत्कृष्ट म्हणचे पाच स्टारची श्रेणी देण्यात येणार आहे. 75 ते 89 टक्के असलेल्यांना उत्कृष्ट व चार स्टार, 51 ते 74 टक्के असणाऱयांना उत्तम परंतु सुधारणेस वाव असा शेरा व तीन स्टार, 35 ते 50 टक्केपर्यंत गुण असणाऱयांना ठिक, सुधारणेची गरज व दोन स्टार, तर 35 टक्केपेक्षा कमी गुण असलेल्यांना सुधारण्याची आत्यंतिक गरज अशा शेऱयासहीत एक स्टार देण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करताना 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंतची कालमर्यादा निश्चित केली आहे. अर्ज करताना शाळेचा यूडायस क्रमांक नोंदवून शाळांना लॉगीन करता येणार आहे.

तालुका ते राज्यस्तर समित्या

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा व राज्य समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील समिती गटशिक्षणाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली असणार असून त्यात निवडक विस्तार अधिकारी, निवडक केंद्रप्रमुख व निवडक मुख्याध्यापकांचा समावेश आहे. तालुक्यात काम करणाऱया निवडक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेता येणार आहे.

जिल्हास्तरीय समिती ही मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली असणार असून त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, मुख्य संशोधन केंद्राचे संचालक, निवडक नामांकित शाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा व स्वच्छता) तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व निवडक एनजीओंचा समावेश असणार आहे. राज्यस्तरीय समिती हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे.

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार MHRD च्या वेबसाईटवर (mhrd.gov.in) मध्ये स्वच्छ विद्यालय-स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2017-18 तसेच स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ऍपच्या माध्यमातून प्रश्नावलीनुसार सर्व शाळांनी याकरिता अर्ज करण्याची कार्यवाही करायची आहे. हा मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोअरमधून किंवा ऍपल आयस्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. जिल्हा व तालुकास्तरावरून नियुक्त समितीने ज्या शाळा पुरस्कारासाठी अर्ज करतील, त्यांनी सादर केलेल्या माहितीची तपासणी करण्याबाबतचे नियोजन वेळेत करायचे आहे. राज्य जिल्हा व तालुकास्तरावरही उत्तम कामगिरी करणाऱया शाळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.