|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘गविं’च्या सहीअभावी शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थकित

‘गविं’च्या सहीअभावी शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थकित 

कुडाळ तालुक्यातील संघटनांची नाराजी

सभापतींची घेतली भेट

शिक्षक आपल्या धाकात राहवेत म्हणूनच..!

वार्ताहर / कुडाळ :

 कुडाळचे गटविकास अधिकारी यांची सही न झाल्याने कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी शनिवारी कुडाळ सभापतींची भेट घेऊन प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.

 शिक्षक समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. शिक्षक आपल्या धाकात राहवेत, अशीच त्यांची कार्यपद्धती आहे. यासाठी त्यांनी धनादेशावर सही केली नाही. त्यांचा मालवण व देवगड तालुक्याचा पूर्वानुभव आम्हाला आहे, असेही ते म्हणाले.

 जिल्हा वित्त विभागाकडून कुडाळ तालुका पंचायत समिती वित्त विभागाला प्राथमिक शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा झाल्याचा मेल आला. पण गटविकास अधिकारी यांची धनादेशावर सही झाली नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मेल येऊनही शिक्षकांचे वेतन बँकेत जमा झाले नाही. याबाबत कुडाळ तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी आज सभापती राजन जाधव यांची भेट घेऊन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

 अणावकर यांच्यासह समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, कुडाळ तालुकाध्यक्ष सचिन मदने, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजाराम कविटकर, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप मसगे, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे तालुकाध्यक्ष धोंडू रेडकर तसेच विजय सावंत, प्रकाश तेंडोलकर, संभाजी तौर, भगवान खरात, समीर राऊळ, राजेश गुरव, सत्यवान चव्हाण, एकनाथ कुर्लेकर आदी शिक्षक उपस्थित होते.

 जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन काही कारणास्तव रखडले होते. पण जिल्हय़ातील सात तालुक्यातील शिक्षकांचे वेतन दोन दिवसांपूर्वी जमा झाले. पण कुडाळ तालुक्यातील शिक्षकांचे वेतन गटविकास अधिकारी यांची सही न झाल्याने जमा झाले नाही. शिक्षकांनी वेतन देयके फॉरवर्ड केली. शिक्षण विभागाने आपली प्रक्रिया पूर्ण केली होती. पण गटविकास अधिकाऱयांची सही झाली नाही, याकडे राणे, मदने व कविटकर यांनी लक्ष वेधले.

  14 सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हा वित्त विभागाकडून वेतनाबाबतचा मेल पंचायत समिती वित्त विभागाला प्राप्त झाला. तेव्हा गटविकास अधिकारी चव्हाण कार्यालयात होते. त्यांची सही घेतली असती आणि बँकेत वेतन रक्कम जमा झाल्यानंतर धनादेश सोडला असता, तर शिक्षकांच्या बँक खात्यावर त्यांचे वेतन जमा झाले असते. काल व आजही गटविकास अधिकारी नसल्याने त्यांची सही मिळाली नाही. ते बाहेरगावी गेले आहेत, असे सांगून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षकांच्या वेतनाबाबत नेहमीच असा निष्काळजीपणा का दाखविला जातो? असा सवाल करण्यात आला.

                गटविकास अधिकाऱयांचा पूर्वानुभव आहे

 तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचेच वेतन उशिराने केले जाते. प्रशासन शिक्षकांकडे वेगळय़ा दृष्टीने पाहते, असेच वाटते, असे अणावकर यांनी सांगून शिक्षक आपल्या धाकात राहवेत, म्हणून गटविकास अधिकारी अशीच कार्यपद्धती अवलंबतात. हा त्यांचा पूर्वानुभव आम्हाला आहे, असे त्यांनी सांगितले.

                 पुन्हा शिक्षकांची तक्रार येता नये!

 सभापती जाधव यांनी पंचायत समितीचे सहाय्यक वित्त अधिकारी यांचे प्रतिनिधी राणे यांना बोलावून वेतनाबाबत विचारणा केली. त्यांनी गटविकास अधिकारी यांची सही झाली नाही हेच कारण पुढे केले. त्यावर यापुढे शिक्षकांचे वेतन वेळेत झाले पाहिजे. वेतन देण्याची जबाबदारी तुमची आहे. पुन्हा शिक्षकांची तक्रार येता नये, असे सभापतींनी सांगितले.

  दरम्यान, गटविकास अधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, आपण  जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शिबिरासाठी दापोली येथे गेलो आहे. शिक्षकांचे वेतन पत्रक आपल्यासमोर सहीसाठी आले नाही. ते आले असते, तर आपण सही केली असती. शिक्षकांच्या वेतनास विलंब झाला, याबाबत आपण चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related posts: