|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरी विरोधी संघटनेचे तब्बल तीन अध्यक्ष

रिफायनरी विरोधी संघटनेचे तब्बल तीन अध्यक्ष 

ओंकार प्रभुदेसाई, कमलाकर कदम व मजीद भाटकर नूतन अध्यक्ष

प्रतिनिधी /राजापूर

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या रिफायनरी विरोधी प्रकल्पग्रस्त मच्छीमार, जमिनमालक व शेतकरी संघटनेची बैठक सोमवारी कुंभवडे येथील गंभीरेश्वर मंदिरात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या अध्यक्षपदी ओंकार प्रभुदेसाई, कमलाकर कदम व मजीद भाटकर या तिघांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी अरविंद सामंत व अब्दुल्ला सोलकर यांची निवड करण्यात आली आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील 14 गावांमध्ये ग्रीन रिफायनरी हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाचे काहीजणांनी आपल्या मागण्या शासनासमोर ठेऊन प्रकल्प समर्थनाची भूमिका घेतली असली तरी या प्रकल्पाला स्थानिक जनतेमधून मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. 9 सप्टेंबर रोजी राजापूर तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या राजकीय पक्ष विरहीत मोर्चाने आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय माघार नाही असा सुतोवाच प्रकल्प विरोधकांनी शासनाला दिला आहे. मात्र शासन येथील मच्छीमार, बागायतदार व देशाचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांच्या या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करत प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यामुळे प्रकल्प विरोधी वातावरण आणखीणच तापले आहे. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रकल्प बाधित 14 गावांसह या गावांमध्ये येत असलेल्या कुंभवडे गाव अशा प्रत्येक गावाच्या कमिटीमधून काही प्रतिनिधींना घेऊन रविवारी कुंभवडे येथील श्री गंभीरेश्वर मंदिरात पार पडलेल्या बैठकीत रिफायनरी विरोधी प्रकल्पग्रस्त मच्छीमार, जमिनमालक व शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी श्री गंभीरेश्वर मंदिरातच संघटनेची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये तब्बल 3 अध्यक्ष निवडण्यात आले. ओंकार प्रभुदेसाई, कमलाकर कदम व मजीद भाटकर यांची यापदी निवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. उपाध्यक्षपदी संजय राणे (सागवे), अनंत भडेकर (चौके), रविकांत राऊत (साखर), रूपेश अवसरे (पडवे) व दशरथ कुवरे, सेक्रेटरीपदी भाई सामंत व अब्दुल्ला सोलकर (नाणार), खजिनदारपदी मनोज देसाई (कुंभवडे), सलमान अ. सोलकर (नाणार), निमंत्रक म्हणून श्रीपाद देसाई (कुंभवडे) यांची तर सल्लागार म्हणून नंदकुमार कुलकर्णी (सागवे) यांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरीतांची सदस्य म्हणून निवड झाली. या संघटनेच्या माध्यमातून प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.