|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मासेमारीला लवकरच कृषीचा दर्जा!

मासेमारीला लवकरच कृषीचा दर्जा! 

मत्स्य उद्योगमंत्री महादेव जानकर यांची माहिती

प्रतिनिधी /रत्नागिरी

मासेमारीला शेतीचा दर्जा मिळावा यासाठी कृषी खात्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजूरी मिळणार आहे. हा दर्जा मिळाल्यास मच्छीमारीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास मत्स्य उद्योग मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्यावतीने सोमवारी सावरकर नाटय़गृहात आरमार विजय दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशातील तामिळनाडू, गुजरात, छत्तीसगढ यासारखे राज्य मच्छीव्यवसायात प्रगतीपथावर आहेत मग आपला राज्य का मागे? नवनवीन मच्छीमारीची कौशल्ये आपल्या मच्छीमारांनी आत्मसात केले पाहिजे. ट्रॉलर वापरण्याची हिंमत इथल्या व्यावसायिकांनी केली पाहिजे, आपली परिस्थिती नाही म्हणून हार न पत्करता आलेल्या स्पर्धेला तोंड दिलेच पाहिजे यासाठी मत्स्य विभागाचे सहकार्य कायम राहिल, असेही त्यांनी सांगितले.

शासनाने मत्स्य विभागाच्या 100 टक्के जागा भरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मच्छीमारांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी सोयीस्कर होईल. मच्छीमारांसाठी ट्रेनिंग सेंटर्सही राज्यात ठिकठिकाणी सुरू करण्यात येत आहे. या ट्रेनिंगचा फायदा व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळेच मच्छी व्यवसायाला कृषी दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत असून लवकरच याला मंजुरी मिळणार आहे. सोयाबीन, ऊस, आणि कापूस या पिकांना नाबार्डचा निधी मिळतो मग मासेमारीला का नाही याचा एक अहवालही सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

पर्ससीननेट आणि पारंपारिक मच्छीमार हा वाद लवकरच मिटणार आहे यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीच्या अहवालानंतर यावर निर्णय होईल असेही जानकर यांनी सांगितले. येथील मिरकरवाडा जेटी मच्छी व्यवसायाचे केंद्रस्थान बनावे यासाठी कोटय़ावधीचा निधीही आपण मंजूर केल्याचे जानकर यांनी आवर्जुन सांगितले.

‘मासळीयुक्त तलाव’ योजना सुरू करणार

जलयुक्त शिवार योजनेच्या यशानंतर याच धर्तीवर मासळीयुक्त तलाव योजना सुरू करण्यात येत आहे. या तलावात तयार झालेल्या माशांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम मत्स्य विभाग करेल. एकंदरीत मच्छी व्यवसायाला चालना मिळावी यासाठी वेगवेगळे प्रयोग आपण करत असल्याचेही महादेव जानकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

व्हीटीएस सुविधा सक्तीचीच

बोटींवर व्हीटीएस सुविधा सक्तीची करण्यात आली आहे. या सुविधेमुळे बोटींकडून कायद्याच्या नियमांची किती अंमलबजावणी होते, कोण नियम मोडताहेत यामुळे प्रशासनाला लक्षात येईल ही यंत्रणा न बसवल्यास संबंधित बोटीचे रजिस्टर रद्द करण्यात येईल, असेही जानकर यांनी शेवटी सांगितले.

Related posts: