|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत, ऑस्ट्रेलिया संघ कोलकात्यात दाखल

भारत, ऑस्ट्रेलिया संघ कोलकात्यात दाखल 

वृत्तसंस्था/ कोलकाता

यजमान भारत आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ येथे गुरुवारी होणाऱया दुसऱया वनडे सामन्यासाठी सोमवारी सकाळी दाखल झाले. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने चेन्नईतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डकवर्थ-लेवीस नियमाच्या आधारे 26 धावानी पराभव करून विजयी सलामी देत आघाडी घेतली आहे.

पांढऱया रंगाचे टी-शर्टस् परिधान केलेले भारतीय संघातील खेळाडू तसेच ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंच्या आगमनावेळी येथे कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. चेन्नईतून चार्टर्ड विमानाने हे दोन्ही संघ कोलकातात दाखल झाले. प्रशिक्षक रवि शास्त्रीसह भारतीय संघाने विमानतळावरून हॉटेलकडे प्रस्थान केले. सोमवारी सराव सत्र नसल्याने खेळाडूंना दिवसभर विश्रांती मिळणार आहे. या मालिकेतील शेवटचे तीन सामने अनुक्रमे इंदोर, बेंगळूर, नागपूर येथे खेळविले जातील. या मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार असून या मालिकेतील सामने रांची, गौहत्ती, हैदराबाद येथे खेळविण्यात येणार आहेत. मंगळवारी दोन्ही संघ इडन गार्डन्स मैदानावर दोन सत्रामध्ये सराव करतील.