|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मोबाईल वापराची आचारसंहिता निर्माण करायला हवी-

मोबाईल वापराची आचारसंहिता निर्माण करायला हवी- 

प्रतिनिधी/ सातारा

सध्या मोबाईलसारखे यंत्र हे अत्यंत घातक हत्यार बनले असून मोबाईल आणि सोशल मीडियामुळे कुटुंबातील संवाद तुटला आहे. पाल्याच्या मोबाईल वापरावर पालकांचे नियंत्रण असायला हवे, नियंत्रण नसेल तर प्रयत्न करूनही कोणत्याच प्रकारचे संस्कार, चांगल्या सवयी लावता येणार नाहीत. सर्वच पालकांनी याचा गांभिर्याने विचार करायला हवा, तसेच मोबाईल वापराची आचारसंहिता निर्माण करायला हवी, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. यावेळी सप्ततारा सांस्कृतिक मंडळाने सीसीटीव्ही बसवल्याबद्दल दीपाली राजू गोडसे यांच्यासह सप्ततारा मंडळातील सदस्यांचे नांगरे-पाटील यांनी अभिनंदन केले. 

  येथील सप्ततारा सांस्कृतिक मंडळाने आपल्या परिसरात लावलेल्या 60 सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या लोकार्पण, तसेच लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम शाहूकलामंदिर येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमती महाडिक, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, ऍड. मुकुंद सारडा, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांच्यासह सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रा. संभाजीराव पाटणे, कूपर कार्पोरेशनचे एन.पी.देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  ते पुढे म्हणाले, महिला व मुलींच्या संरक्षणासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आले आहेत. तसेच चोरी-दरोडे करणाऱयांच्या यादी प्रमाणे महिलांची छेड काढण्यात सरावलेल्यांची यादीही पोलीस ठाणे निहाय करण्याचे काम परिक्षेत्रात सुरू केले आहे. निभर्या पथकांच्या माध्यमातून परिक्षेत्रात बारा, तर जिह्यात पाच हजार जणांवर कारवाई झाली आहे. मात्र, जो पर्यंत महिला व मुलींमध्ये आपले मित्र, ओळखीचे यांचे स्वभाव, त्यांची संबंध प्रस्थापीत करण्यामागची भावना, व परिसरात घडणाऱया गोष्टींकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहण्याची जागृती येत नाही तोपर्यंत गुन्हे रोखण्यात अडचणी येत राहणार आहेत. त्यामुळे महिला व मुलींनी कोणाबरोबरही बाहेर जाताना सावध असले पाहिजे. त्याचबरोबर आपला गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी डेटवर गेलेल्या महिलांवर अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. तसेच ड्रिंकमधून मादक पदार्थ देऊन शोषण केले जाते. यासर्वांचा विचार करून सजगपणे वावरले पाहिजे, कायद्यांची माहिती करून घेतली पाहिजे, सर्वात महत्वाचे पोलीस तसेच अन्य शासकीय नोकऱयांमध्ये समावेश होण्यासाठी मुलींनी प्रयत्न केले पाहिजेत.

महिला व मुलींच्या संरक्षणासाठी अनेक कडक कायदे तयार झालेत. मात्र, जोपर्यंत मुली व महिला आपले मित्र, सभोवतालचे वातावरण वाचायला शिकत नाहीत, तोपर्यंत सुरक्षीत वातावरण निर्माण होणार नाही. त्यामुळे कोणतीही मैत्री, कोणतेही डेटींग किंवा कामाच्या ठिकाणी उघडय़ा डोळ्यांनी वावरायला शिका, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. 

  मोबाईल हा सध्या अत्यंत घातक हत्यार बनले आहे, मुलींसाठी तर, ते अत्यंत धोकादायक आहे. मोबाईलवर सर्वात जास्त अश्लिल चित्रफिती पाहिल्या जातात ते वास्तव आहे. त्यामुळे अनेक गैर प्रकारांना मुले-मुली बळी पडतात. त्याचबरोबर मोबाईल व सोशल मीडियामुळे कुटुंबातील संवाद संपला आहे. यामुळे वयोवृद्धांचे कुटुंबातील महत्व कमी होत असून वयोवृध्दा वृध्दाश्रमाकडे दाखल होत आहेत.    

  सप्ततारा सांस्कृतिक मंडळाने लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेल्या सामाजिक कार्याची जपणूक करत सीसीटीव्ही बसविल्याचे सांगत याबद्दल त्यांनी राजू गोडसे व दिपाली गोडसे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचाही मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वीरपत्नी लेफ्टनंट श्रीमती स्वाती महाडिक म्हणाल्या, शहीद संतोष महाडिक यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान मला असून महिला व मुलींनी फक्त करिअर व संसार या दोन्ही गोष्टींकडे न पाहता एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, एन.डी.ए. या माध्यमातून आपआपले करिअर निवडून काम करावे, कोणतेही काम महिला करु शकत नाही, असे होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी आव्हानांना सामोरे जावे. माझ्यावर दुःखाचा डोंगर असताना सुध्दा लेफ्टनंट होण्यासाठी 11 महिने प्रचंड सराव करुन मी लेफ्टनंटपदी कार्यरत झाल्याचा आनंद वाटतो. माझ्या या कारकीर्दीत मला माझ्या कुटुंबीयांनी चांगला आधार दिला. सप्ततारा मंडळाने घेतलेल्या या उपक्रमामुळे समाजाला त्याचा फायदा होणार असून त्याचे अनुकरण इतर मंडळांनी करावे. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, माझ्या कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाने राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्याचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा व येणाऱया नवरात्र उत्सवात नवरात्रउत्सव मंडळांनीसुध्दा आपआपल्या परिसरात सी.सी.टी.व्ही बसवावेत, असे आवाहन केले. 

 यावेळी बोलताना ऍड. मुकुंद सारडा म्हणाले, मंडळाच्या स्थापनेपासून गेली 22 वर्षे मी प्रत्येक कार्यक्रमास येत असतो. तथापि, आजचा कार्यक्रम म्हणजे मंडळाच्या कार्यातील मानाचा शिरपेचाचा तुरा आहे. विनोद कुलकर्णी म्हणाले, सप्ततारा मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम दीपाली गोडसे राबवत असून त्यांच्या कार्यास शुभेच्छा. तसेच असेच कार्यक्रम त्यांनी मोठय़ा प्रमाणावर राबवावेत, असे सांगितले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. प्रास्ताविक राजू गोडसे यांनी, तर आभार बापूसाहेब उथळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष काटवे, श्रीरंग महामूलकर, मामा शिंदे, प्रणव बाचल, सचिन सावंत, विजय दाभोळकर, दीपक सुतार, मंगेश लाटकर, मोहन कुंभार, प्रमोद गोडसे, हरिष गोडसे, कुलदीप घाडगे, हर्षलभैय्या चिकणे प्रतिष्ठान, हेरंब प्रतिष्ठान, राजमुद्रा गणेशोत्सव मंडळ, युवा क्रांती प्रतिष्ठान, गोल मारुती देवस्थान ट्रस्ट, सप्ततारा महिला मंडळ, महिला बचतगट, राजधानी व्यापारी संघ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला, मुली व युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.