|Sunday, April 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हत्तरगी टोलनाक्याजवळ शेतकऱयांचा रास्तारोको

हत्तरगी टोलनाक्याजवळ शेतकऱयांचा रास्तारोको 

हत्तरगी वार्ताहर

 पीक नुकसान, कर्जमाफी यासह विविध मागण्या त्वरित मान्य कराव्यात या मागण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी टोलनाक्याजवळ रास्तारोको करुन शेतकऱयांनी आंदोलन केले. यावेळी सुमारे अर्धा तास महामार्ग बंद करण्यात आला होता.

 जिल्हा प्रशासनाकडे विविध मागणी करून सुध्दा जिल्हा प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. यावेळी सरकारविरोधात  घोषणाबाजी केली. परिणामी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रास्तारोकोच्या ठिकाणी ताटकळत उभे रहावे लागले. खासगी संस्था, राष्ट्रीयकृत बँकेतील कर्ज माफ करावे, कृषी यंत्रोपकरणासाठी मिळालेले कर्ज माफ करावे, पीक नुकसान भरपाई, पीक वाहतुकीवरील टोल रद्द करावा या मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ रास्तारोको

बाळेपुंद्री : जिल्हा प्रशासनाकडे विविध मागणी करूनसुध्दा जिल्हा प्रशासनाने  मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुक्यातील शेतकऱयांसह हिरेबागेवाडी आसपासच्या गावातील शेतकऱयांनी हिरेबागेवाडीनजीक राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन छेडले. यावेळी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. या आंदोलनात बेळगाव जिल्हा भारतीय कृषक समाज,   तालुक्यातील विविध शेतकरी संघाच्या संघटनानी पुकारलेल्या या रास्तारोको आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. विविध मागण्या करूनसुध्दा जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने हे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत हिरेबागेवाडी टोलनाक्याच्या घटनास्थळी बेळगावचे तहसीलदार मंजूळा नाईक यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. यानंतर शेतकऱयांनी विविध मागण्याचे निवेदन सादर केले.

 

Related posts: