|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वित्तीय साक्षरता वृद्धिंगत करा!

वित्तीय साक्षरता वृद्धिंगत करा! 

कुडाळ महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता’वर व्याख्यान

वार्ताहर / कुडाळ :

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वित्तीय साक्षरता वृEिद्धगत करून वित्तार्जनाकडे आत्तापासूनच लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित व्याख्यानांतर्गत ‘आर्थिक साक्षरता’ यावर बोलताना डॉ. अनिल नेरुरकर यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, बचत व गुंतवणूक यातील परस्पर संबंध भारतीय लोकांना समजणे गरजेचे आहे. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ प्राप्त करून आपली स्थावर मालमत्ता वाढविणे हे आजच्या स्पर्धेच्या युगात गरजेचे बनले आहे. लोकांना दैनंदिन व्यवहारामध्ये किमान खर्च व कमाल गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करता आले पाहिजे. आजचे युवक संगणक साक्षर असले, तरी त्यांच्यामध्ये कमालीची आर्थिक निरक्षरता आहे आणि त्यामुळेच बेरोजगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. जागतिक पातळीवरचा विचार करता, भारतीय लोकांमध्ये खऱया अर्थाने गुंतवणुकीसंदर्भात सखोल जनजागृती करणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना एकाच ठिकाणी न करता विभिन्न पर्यायात करावी. ज्यामुळे एखाद्या ठिकाणी परतावा कमी झाला, तरी तो इतर पर्यायातून भरून निघतो.

त्यांनी आर्थिक साक्षरतेचा विषय विद्यार्थ्यांसमोर अतिशय सोप्या भाषेत व गंमतीदार उदाहरणांद्वारे मांडला. चेक, बँक अकाऊंट व प्लास्टिक चलन वापरताना घ्यायच्या दक्षताही सांगितल्या. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांबरोबर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांबाबत चर्चा करावी व आजपासून छोटय़ा बचती निर्माण करून गुंतवणुकीच्या नवनवीन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

डॉ. अनंत लोखंडे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी नवीन गुंतवणूकदारांनी संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करावी, असे सांगितले. अनेक गुंतवणूक संस्था जादा परताव्याचे आमिष दाखवितात. परंतु गुंतवणुकदारांनी त्याला बळी न पडता सुरक्षित पद्धतीने आपली गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

प्रा. प्रशांत केरवडेकर, प्रा. कमलाकर चव्हाण व प्रा. दीपक चव्हाण तसेच कला व वाणिज्य विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. चव्हाण, तर आभार प्रा. केरवडेकर यांनी मानले.