|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बिळवस येथे दरड कोसळल्याने दोन घरांना धोका

बिळवस येथे दरड कोसळल्याने दोन घरांना धोका 

प्रतिनिधी / मसुरे :

बिळवस येथे अतिवृष्टीमुळे वस्तीच्या दोन ठिकाणी दरड कोसळल्याने येथील घरांना धोका निर्माण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली असून येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. प्रशासनाने त्वरित पाहणी करून दरड हटवावी व आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थ सूर्यकांत पालव यांनी केली आहे.

मसुरे बिळवस येथील सूर्यकांत पालव व महेश मनोहर पालव यांच्या घरानजीक असलेल्या दरडी या दोघांच्याही अंगणात कोसळल्या. शशिकांत पालव यांच्या घरानजीकची दरड घराच्या पडवीवरही पडली. परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणीही नसल्याने अनर्थ टळला. सूर्यकांत पालव हे पायाने अपंग असून अंगणात पडलेली दरडीची माती व दगड दूर करणे त्यांना त्रासाचे आहे. अशीच अतिवृष्टी होत राहिल्यास आणखी काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले असून योग्य ते सहकार्य येथील ग्रामस्थांना देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतचे लेखी निवेदन सूर्यकांत पालव यांनी मसुरे ग्रामपंचायत व महसूल विभागाला दिले आहे.

लाईफ जॅकेटचे वितरण

मसुरे पूरग्रस्त गाव असल्याने उशिरा का होईना महसूल विभागाला जाग आली आहे. मंगळवारी आलेल्या पुरामुळे मालवण नायब तहसीलदार एस. एस. गोसावी यांनी मसुरे येथे येऊन पूरस्थितीची पाहणी केली. तातडीने दहा लाईफ जॅकेट व दहा रिंग मसुरे ग्रामपंचायतीकडे सुपुर्द केले असून बंद असलेली फायबर होडी दुरुस्तीच्या सूचना गोसावी यांनी संबंधितांना दिल्या आहेत. यावेळी सरपंच पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी युगल किशोर प्रभूगावकर, मंडळ अधिकारी आर. व्ही. निपाणीकर, अरुण वनमाने, एस. आर. कांदळकर, पी. डी. मसुरकर, डी. व्ही. शिंगरे, तलाठी आदी उपस्थित होते. मंगळवारी तळाणी येथे कोसळलेल्या दरडीची पाहणी सरपंच पेडणेकर, पं. स. विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. ए. गोसावी, ग्रामविकास अधिकारी युगल किशोर प्रभूगावकर व ग्रामपंचायत कर्मचाऱयांनी केली. या दरडीची रस्त्यावर आलेली माती दूर करून देण्याचे आश्वासन सरपंच पेडणेकर यांनी दिले.

बिळवस येथे दरड कोसळून झालेल्या नुकसानीची पंचयादी महसूल प्रशासनाने बनवली असून मंगेश मनोहर पालव यांचे 80 हजार व सूर्यकांत पालव यांचे 50 हजार रुपयांचे, मागवणे येथील अशोक सोनू दुखंडे यांच्या घराचा काही भाग अतिवृष्टीमुळे कोसळून 11 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे.

Related posts: