|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मेक्सिकोला भूकंपाचा हादरा : 288 ठार

मेक्सिकोला भूकंपाचा हादरा : 288 ठार 

मेक्सिको सिटी / वृत्तसंस्था

दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको देशच्या या राजधानीनजिक झालेल्या विनाशकारी भूकंपात किमान 288 लोकांचा बळी गेला आहे. असंख्य उंच इमारतींचे अक्षरशः ढिगारे झाले असून त्याखाली शेकडो लोक अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे. 1985 च्या अतिविनाशकारी भूकंपाचा 32 वा स्मृतीदिन पाळण्यात येत असतानाच हा आणखी एक तडाखा बसला.

रिश्टर परिमाणानुसार या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा धक्का बसला. अनेक नागरिकांनी 1985 च्या भूकंपाच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित बचावकार्य सरावाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. हा कार्यक्रम आटोपून लोक घरी परतल्यानंतर काही वेळातच या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्र मेक्सिको शहरापासून 76 किलोमीटरवर राबोसो शहरानजीक होते. या भूकंपाची नोंद जगातील अनेक भूकंपमापन केंद्रांवर करण्यात आली आहे.

इमारती गदागदा हादरल्या

या भूकंपात अनेक उंच इमारती गदागदा हलल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुमारे 1 मिनिटभर धक्के जाणवले. त्यामुळे हजारो लोकांनी रस्त्यांवर धाव घेतली. यामुळे वाहतूक कोंडी होऊन स्थिती आणखीनच बिघडली. रस्त्यांनाही अनेक ठिकाणी भेगा पडल्याने त्यात वाहने अडकल्याचे प्रकार घडले. वीजपुरवठा खंडित झाला. तसेच दूरसंचार यंत्रणाही काही काळ ठप्प होती. परिणामी साहाय्यता कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.

राबोसो पूर्णतः उद्ध्वस्त

आतापर्यंत 150 हून अधिक मृतदेह हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे. मृतांची आतापर्यंतची संख्या 288 आहे. मोठय़ा प्रमाणावर बचाव कार्य हाती घेण्यात आले असून त्यात स्वयंसेवी संघटनांचा पुढाकार आहे. पोलीस आणि मेक्सिको सरकारचा तांत्रिक विभाग पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱयांखालून जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्याच्या प्रयत्न करीत आहे. भूकंपाच्या या तडाख्यात राबोसो शहर पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून शहरातील 200 हून अधिक इमारती पूर्णतः नष्ट झाल्या आहेत. मेक्सिको शहरातही प्रचंड हाहाकार उडाला आहे.

गेल्या आठवडय़ात दक्षिण अमेरिकेत झालेल्या 8 रिश्टर क्षमतेच्या भूकंपात 90 हून अधिक लोक ठार झाले होते. त्या घटनेची आठवण ताजी असतानाच हा भूकंप झाला आहे. मेक्सिकोच्या प्रशासनाने देशभरात दक्षतेचा इशारा दिला असून इतर देशांनीही या देशाला मदतीचा हात पुढे केला आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षांनी देशाला उद्देशून भाषण करून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

आंतरराष्ट्रीय विमाने रद्द

मेक्सिको शहरातून इतरत्र जाणारी आणि येथे येणारी सर्व विमाने चोवीस तासांसाठी रद्द करण्यात आली होती. या विमानतळाचीही पडझड झाली आहे. तेथे दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले आहे. काही काळात आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Related posts: