|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सदाभाऊंच्या संघटनेचा ‘नारळ’ आज फुटणार

सदाभाऊंच्या संघटनेचा ‘नारळ’ आज फुटणार 

विक्रम चव्हाण / सांगली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेले कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नव्या संघटनेचा घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज कोल्हापुरात ‘नारळ’ फुटणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व खा. राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी सदाभाऊंनी त्यांच्या सर्व विरोधकांना नव्या संघटनेच्या व्यासपिठावर येण्याचे आवतन दिले आहे. यामुळे सदाभाऊंच्या संघटनेचा नेमका अजेंडा काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

जिह्यातून प्रतिसाद नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विचारांची कास सोडल्याचा ठपका ठेवत खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. पुणतांब्यातील शेतकऱयांचा संप फोडल्याचा ठपका ठेवत त्यांना ‘खलनायक’ अशी उपमाही दिल्यामुळे व्यथीत झालेल्या सदाभाऊंनी ‘यापुढे झेंडा आपला, दांडा आपला व दोरीही आपलीच’ असे म्हणत नवी संघटना काढण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी गेल्या महिनाभरापासून चाचपणी करण्यास सुरूवात केली होती. होमपिच असलेल्या वाळवा तालुक्यासह सांगली जिह्यातून त्यांना अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. जिह्यातील स्वाभिमानीच्या शिलेदारांनी चळवळीशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतल्याने जिह्यातूनच त्यांच्या नव्या संघटनेच्या मनसुब्यांना धक्का पोहोचला होता.

खा. शेट्टी विरोधकांची फिल्डींग

यामुळे त्यांनी कोल्हापूर जिह्यात लक्ष घातले होते. विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदार संघ ‘टार्गेट’ केला होता. खा. शेट्टी यांच्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आल्याचे दिसून येत आहे. चाचपणी पूर्ण झाल्यानंतर घटस्थापनेदिवशी नव्या संघटनेची बीजे रोवण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानुसार आज कोल्हापूरमध्ये त्यांच्या नव्या संघटनेचा नारळ फुटणार आहे.

मार्केट यार्डातील छत्रपती शाहू सांस्कृतिक भवनमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून त्यांनी चांगलीच पेरणी केली आहे. इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादीच्या निवेदिता माने, महादेवराव महाडिक यांच्यासह खा. राजू शेट्टी विरोधकांच्या भेटी-गाठी घेत ‘फिल्डींग’ लावली आहे.

संघटनेच्या अजेंडय़ाबाबत उत्सुकता

सदाभाऊंच्या संघटनेचा नेमका अजेंडा काय असणार याबाबत उत्सुकता लागून आहे. सदाभाऊंना व त्यांच्या नव्या संघटनेला भाजपचे बळ आहे हे आता लपून राहीले नाही. याशिवाय शेट्टींना शह देण्यासाठीच भाजपच्या बळावर नव्या संघटनेचा खेळ सुरु करण्यात आला आहे. नव्या संघटनेच्या प्रचारार्थ सोशल मिडीयावर व्हायरल  झालेला “उठ मर्दा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो’’ हा त्यांचा स्लोगन सद्या कोल्हापूर जिह्यात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे संघटनेची बीजे रोवताना सदाभाऊ नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्ता की चळवळ

नव्या संघटनेच्या संघटनेमध्ये येण्यासाठी स्वाभिमानीतील राजू शेट्टी यांच्या खंद्या समर्थकांनाही गळ घालण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिह्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी सदाभाऊंनी जाळे टाकण्यास सुरवात केली आहे. मात्र त्यांच्या हाताला स्वाभिमानीचा एकही शिलेदार लागलेला नाही. काही जण संभ्रमात आहेत. सदाभाऊंच्या बरोबर जात सत्तेला कवटाळायचे की चळवळीशी प्रामाणिक रहायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

 

दरम्यान सदाभाऊ नव्या संघटनेची रणणिती जाहीर करताना खा. शेट्टी यांच्यावर टिकेची झोड उठवणार हे निश्चीत आहे. तर सदाभाऊंकडून होणाऱया प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनही तयारी केली आहे. सदाभाऊंच्या प्रत्येक आरोपाला ऊस परिषदेत प्रत्युत्तर देण्यासाठी खा. शेट्टी यांनीही तयारी केली आहे.

ऊस दर कळीचा मुद्दा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसदर हा कळीचा मुद्दा आहे. ऊस दर आंदोलनामुळेच स्वाभिमानीची पाळेमुळे शेतकऱयांच्या मनात खोलवर रुजली आहेत.  यंदाचा गाळप हंगाम जवळ आला आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी आंदोलन करणार हे स्पष्ट आहे. काही संघटनांनी साडेतीन हजार रुपयांची पहिली उचल मागितली आहे. राजू शेट्टीही 3200 च्या आसपास भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर सदाभाऊंची भूमिका काय असणार याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष आहे.

Related posts: