|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ओव्हर फ्लो झाल्याने कोयनेतून विसर्ग

ओव्हर फ्लो झाल्याने कोयनेतून विसर्ग 

प्रतिनिधी/ नवारस्ता

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे राज्याची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण दुसऱयांदा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 14010 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 2100 असे मिळून एकूण 16110 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अगोदरच दुथडी भरून वाहत असणाऱया कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टीला सुरूवात  झाली आहे. गेल्या चोवीस तासात नवजा येथे 159 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 141 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे   कोयना धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढू लागला आहे. धरणाच्या पाणीसाठय़ात येणारी पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढून प्रतिसेकंद 35 हजार 735 क्युसेक वेगाने ही आवक सुरु झाली आहे. त्यामुळे गेल्या 72 तासांत धरणात तब्बल 5 टीएमसी पाण्याची वाढ होऊन कोयना धरण दुसऱयांदा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाल्याने धरणातील जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावर उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 14010 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक असे मिळून एकूण 16110 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांच्या प्रमुख उपस्थित बुधवारी सकाळी 9 वाजता सुरु करण्यात आला.

प्रारंभी धरणाचे पायथा वीजगृह कार्यान्वित करून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करणेत आला. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे 10.30 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून कोयना नदीपात्रात 9297 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. तर पाणलोट क्षेत्रातून धरणात येणारी पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात असल्याने दुपारी 3.30 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी अर्ध्या फुटाने उचलून धरणातून एकूण 16110 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कोयना धरणातून सुरु असलेला विसर्ग आणि सुरु असलेला पाऊस यामुळे कृष्णा, कोयना नदीला पूर आला असून कोयना नदीवरील संगमनगर धक्का जुना पूल, निसरे फरशी पाण्याखाली गेले आहेत.

दरम्यान, पाटण तालुक्यातील विविध विभागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे तालुक्यातील मोरणा- गुरेघर, साखरी-चिटेघर, वांग-मराठवाडी, महिंद, उत्तरमांड आणि तारळी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून हे प्रकल्प ही ओव्हर फ्लो झाले आहेत.

 दरम्यान, गेल्या चोवीस तासांत  कोयना 98 (4424), नवजा 159 (5330) आणि महाबळेश्वर येथे 141 (4469) मिलीमीटर पवासाची नोंद झाली.

पाणीपातळी 2163.1 फूट,658.308 मीटर आणि पाणीसाठा 104.70 टीएमसी झाला आहे.

 

दोन वेळा धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले

चालू तांत्रिक वर्षात 30 जुलै रोजी  कोयना धरणातील पाणीसाठा 82.31 टीएमसी असताना कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उचलून कोयना नदीत 11792क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा आज बुधवारी दुस्रयांदा धरणाचे सहा वक्र  दरवाजे उचलून विसर्ग करण्यात आला आहे.

 

तर आणखी विसर्ग वाढणार…!

कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी रात्री नंतर पावसाचा जोर वाढल्यास धरणातील आवकही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पावसाचा पुन्हा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढण्याची शक्यता कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ’तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली

Related posts: