|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » उद्योग » येस बँकेडून मोठी नोकरकपात

येस बँकेडून मोठी नोकरकपात 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

ऐन सणासुदीच्या काळात येस बँकेने आपल्या 2,500 कर्मचाऱयांना घरी पाठवत मोठी नोकरकपात केली आहे.. ही संख्या बँकेच्या एकूण कर्मचारी संख्येच्या 10 टक्के इतकी आहे. निकृष्ट कामगिरी, डिजिटायझेशन आणि अनेक कर्मचाऱयांची आवश्यकता नसल्याने ही नोकरकपात करण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. येस बँकेत 21,000 कर्मचारी कार्यरत आहेत. एचडीएफसी बँकेनंतरची ही खासगी क्षेत्रातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी नोकरकपात आहे. एचडीएफसीने मार्च 2017 पर्यंतच्या तीन त्रैमासिंकात तब्बल 11,000 जणांना नोकरीवरून काढून टाकले होते.

बँकेच्या नियमित भांडवल व्यवस्थापन प्रक्रियेनुसार उत्पादकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करून या आधारांवर बँक वेळोवेळी कार्यक्षमतेचे परिक्षण करत काही निर्णय घेते. तसेच दरवर्षी निकृष्ट कामगिरी नोंदविणाऱया कर्मचाऱयांची ओळख पटवत नोकरकपात केली जाते. ही प्रक्रिया अन्य खासगी बँकासारखीच असल्याचे स्पष्टीकरण येस बँकेच्या व्यवस्थापनाने दिले आहे.

येस बँकेच्या या निणर्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण अलीकडेच बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांनी वरिष्ठ व्यवस्थापनाला ई-मेलद्वारे शाखेंच्या संख्येत वाढ करून 1,800 वर नेण्याचे निर्देश दिले होते. सध्या बँकेच्या 1,020 शाखा कार्यरत आहेत. तसेच या मेल मध्ये शाखा, एटीएम, कार्ड्स, पीओएस मशिनींना त्यांनी जोखिम संबोधले होते.