|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » विराट-रहाणेची अर्धशतके, तरीही भारत सर्वबाद 252

विराट-रहाणेची अर्धशतके, तरीही भारत सर्वबाद 252 

वृत्तसंस्था /कोलकाता :

कर्णधार विराट कोहली (92) व अजिंक्य रहाणे (55) यांनी तडफदार अर्धशतके झळकावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने येथील दुसऱया वनडे लढतीत भारताला निर्धारित 50 षटकात सर्वबाद 252 धावांवर रोखण्यात यश प्राप्त केले. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर विराटने नेतृत्वाला साजेशी खेळी साकारत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. शिवाय, अजिंक्य रहाणेसमवेत 111 चेंडूत 102 धावांची दमदार भागीदारी साकारली, ते या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले.

विराट कोहलीने आपल्या 107 चेंडूतील खेळीत 8 चौकारांसह 92 धावांची तडफदार खेळी साकारली. अजिंक्य रहाणेने देखील 64 चेंडूत 7 चौकार वसूल केले. ही जोडी क्रीझवर असताना भारताची मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने जोरदार आगेकूच सुरु होती. पण, डावातील 24 व्या षटकात हे दोन्ही सेट फलंदाज तंबूत परतले व भारताच्या डावाला पाहता पाहता गळती लागली. तत्पूर्वी, ईडन गार्डन्सवर तिन्ही क्रिकेट प्रकारात सर्वोत्तम खेळी साकारणारा रोहित शर्मा येथे केवळ 7 धावांवर बाद झाला तर मनीष पांडेचा (3) खराब फॉर्म देखील कायम राहिला.

तसे पाहता, रहाणे धावचीत झाल्यानंतर देखील कोहली आपल्या सर्वोत्तम बहरात होता. शिवाय, त्याचे फटके चपखल बसत होते. चेंडूमागे एक धाव या समीकरणाने 24 चेंडूत 24 धावा जमवणाऱया केदार जाधवसमवेत त्याने चौथ्या गडय़ासाठी 55 धावांची भागीदारी साकारली. पण, नाईलने केदार जाधव व विराट यांना लागोपाठच्या षटकात बाद करत भारताच्या घोडदौडीला काहीसा लगाम लावला होता. विराटचे वनडेतील 31 वे शतक हुकले असले तरी त्याच्या खेळीमुळेच भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करता आला. केदार जाधव नाईलचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात ग्लेन मॅक्सवेलकडे झेल देत तंबूत परतला.

मध्यमगती गोलंदाज नॅथन काऊल्टर-नाईल (3-51) व केन रिचर्डसन (3-55) यांनी ईडन गार्डन्सच्या स्लो विकेटवर काही धक्के देत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. तेज गोलंदाज पॅट कमिन्स (1/34) व डावखुरा फिरकीपटू ऍस्टन ऍगर (1/54) यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला. डावातील फक्त 15 चेंडू बाकी असताना पावसाचा व्यत्यय आल्याने 18 मिनिटे खेळ थांबवावा लागला. भारतीय संघाच्या खात्यावर त्यावेळी 7 बाद 236 धावा होत्या.

जेम्स फॉकनरऐवजी संघात परतलेल्या रिचर्डसनने मागील सामन्यातील हिरो महेंद्रसिंग धोनी (5) व हार्दिक पंडय़ा (20) यांना स्वस्तात बाद करत महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. वास्तविक, भारतीय संघ या लढतीत एकवेळ 35 षटकात 3 बाद 186 अशा उत्तम स्थितीत होता. पण, नंतर सातत्याने धक्के बसत राहिले व डावातील शेवटच्या चेंडूवर चहल धावचीत झाल्यानंतर भारताचा डाव देखील 50 षटकात सर्वबाद 252 धावांवर आटोपला.

पंडय़ाला दुखापत

भारताच्या डावात भुवनेश्वर कुमारने खणखणीत फटका लगावल्यानंतर नॉन स्ट्रायकर एण्डवरील पंडय़ाच्या हेल्मेट ग्रिलवर चेंडू आदळला. हा आघात इतका जोरदार होता की, त्यामुळे पंडय़ा क्षणार्धात मैदानावर कोसळला होता. शिवाय, ऑस्ट्रेलियन खेळाडू लगोलग त्याच्या दिशेने धावले. पण, नंतर दुखापत किरकोळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळाला.