|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » एकातून सुटलेल्या भोंदूबाबाला दुसऱया प्रकरणी कोठडी

एकातून सुटलेल्या भोंदूबाबाला दुसऱया प्रकरणी कोठडी 

प्रतिनिधी /रत्नागिरी

महिलेला अश्लिल शिवीगाळ केल्याच्या गुन्ह्यात जामिनावर मुक्त झाल्यावर श्रीकृष्ण अनंदा पाटील या भोंदू पाटीलबुवाविरूद्ध लगेचच रात्री जादूटोणाविरूद्ध कायद्यांतर्गत तसेच फसवणुकीचेही अन्य गुन्हे दाखल करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या गुह्यांप्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 28 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र या बाबाच्या प्रकरणाची चर्चा होत आहे. पाटीलबुवाविषयी निरनिराळ्य़ा घटना पुढे येत आहेत. राज्यातच नव्हे तर देशभर रत्नागिरीतील दुसरा रामरहिम अशी चर्चा होताना दिसत आहे. सुरूवातीला या प्रकरणी कुणी तक्रारदार पुढे न आल्याने हे प्रकरण थंडावणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र यानंतर एका महिलेने पुढाकार घेत या भोंदूबाबाविरूद्ध अश्लिल शिवीगाळ, दमदाटीची तक्रार दिली. या प्रकरणी श्रीकृष्ण पाटीलविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर गुरूवारी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती. याचवेळी हा बाबा पूर्वी पोलीस दलातच कामाला असल्याने त्याला सुटण्याचे मार्ग माहित असल्याचीही चर्चा सुरु होती. पहिल्या प्रकरणात किरकोळ गुन्हे दाखल झाल्याने व जामीनही मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र अन्य गुन्हे दाखल होऊन त्याला पुन्हा अटक झाल्याने व कोठडी मिळाल्याने काही चर्चांना तूर्त पूर्णविराम मिळाला आहे.

मात्र, यानंतर लगेचच रात्री ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी फिर्याद नोंदवली. यानुसार श्रीकृष्ण पाटीलविरूद्ध जादूटोणाविरोधी कायदा कलम 2(1) ख अनुसूची अनं 2, 5, 8 कलम 3 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानुसार श्रीकृष्णने ‘मी कलियुगातील स्वामीचा अवतार आहे. स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे. आपण चमत्कार करू शकतो, असे भासवून मेलेले मूल 3 सेकंदात जीवंत केले. आंधळ्याच्या डोळ्यावरून हात फिरवले व त्याला दृष्टी आली. मी माणूस नाही देव आहे, असे सांगून लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून आर्थिक प्राप्ती करून घेत झरेवाडी येथे मठाचे बांधकाम केले. तसेच लोकांना डॉक्टरकडे जावू नका, असा सल्ला देऊन अनिष्ठ व अघोरी प्रथांना खतपाणी घातले, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच या भोंदू बुवाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्य़ाप्रकरणीही लगेच श्रीकृष्ण पाटील यास अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यानच्या काळात झरेवाडी येथील ग्रामस्थांनी पाटीलबुवावर कडक कारवाई व्हावी व त्याचा मठ बंद करण्यात यावा, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिल्याने जनमताचा रेटाही वाढताना दिसत आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीसह काही स्वयंसेवी सस्थांनीही या भोंदूबाबावर कडक कारवाई होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नजीकच्या काळात अधिकाधिक तक्रारदार निर्भयपणे पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बाबाला वाचवण्यासाठी सरसावलेल्या अनेकांनी या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरु झाल्यानंतर तोंडे लपवायला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. या बाबावर यापुढे कोणती कारवाई होते, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.