|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राज यांचा सोशल ‘गेम’

राज यांचा सोशल ‘गेम’ 

राज्यभरात परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळाने बळीराजा सुखावला आहे. पाणीसाठय़ात वाढ झाल्याने पीक पाण्याचा प्रश्न नाही म्हटला तरी मिटला असे सुखावणारे चित्र आहे. दुसरीकडे मात्र राज्याच्या राजकारणात उलथापालथी, नव्या नांदीचे घट स्थापले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात 2017 चा नवरात्रोत्सव काँग्रेस पक्ष, नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी त्यांच्या वाटचालीतला नवा अध्याय ठरणारा आहे. विशेषत: तरुण मनाला नेहमी साद घालणारे, त्यांच्या मनातील भाषा जाणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ‘सोशल गेम’ खेळणार आहेत. इंटरनेट विश्वातील तरुणाई ज्याच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे त्या फेसबुकवर राज ठाकरे यांनी गुरुवारी एंट्री केली.

ऑनलाईनच्या जगात सगळे कसे सेकंदात एकमेकांशी जोडले जाऊ लागले आहे. फेसबुकच्या भिंतीवर मैत्रीचे धागे विणले गेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी ओळख होऊन विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. तरुणाईला स्वतंत्र व्यासपीठ मिळाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भेडसावणाऱया समस्या, वास्तव बेधडक मांडण्यासाठी तरुणच नाहीतर गृहिणीपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी फेसबुकला आपल्या मोबाईल,
लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये जागा करून दिली. एका सर्वेक्षणात तरुणवर्ग आठवडय़ातले तब्बल 28 तास सोशल मीडियावर रेंगाळलेला असतो, असे निरीक्षण नोंदवले आहे. हीच नस राज ठाकरे यांनी आता पकडली आहे.

सोशल मीडियाची ताकद किती प्रभावी परिणाम दाखवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका. लोकसभा निवडणुकीत भाजपने फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ऍप, भाजप नोंदणी, मिसकॉल्ड देऊन समर्थन मागणे यासारख्या माध्यमातून देशभरात वातावरणनिर्मिती केली. आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली आणि ते त्यात यशस्वी झाले. देशात आणि राज्यात भाजपने सत्ता काबीज केली. या त्यांच्या यशात सोशल मीडियाचा महत्त्वाचा वाटा आहे.

राज ठाकरे यांनी 11 वर्षांपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तरुण वर्गाला नवा नेता मिळाला होता. 2009 च्या निवडणुकीत मनसेने एका दमात 13 आमदार विधिमंडळात धाडले. नाशिक महापालिकेत मनसेने सत्ता स्थापन करून कामाचा उत्तम नमुना सादर केला. पण 2014 च्या निवडणुकीत मनसेचे इंजिन रुळावरून घसरले. दरम्यानच्या काळात राज यांच्या अनेक सहकाऱयांनी मनसेनेतून बाहेर पडून दुसऱया पक्षांच्या वळचणीला आपली राजकीय चूल पेटवली. एकीकडे राजकीय पटलावर मनसेचे अस्तित्व नाहीसे होते की काय अशी स्थिती असताना राज ठाकरे मात्र विचलित न होता देश, राज्यातील अंदाधुंदीच्या कारभारावर तुटून पडत होते. जणू काय त्यांनी एकहाती किल्ला लढवण्याचा निर्धारच केला होता. निवडणुकांआधी ज्या नरेंद्र मोदी, भाजपचे गुणगाण त्यांनी गायिले होते त्यांच्या कारभाराचेही वाभाडे काढण्यात त्यांनी हयगय केली नाही. सलग 15 वर्षे सत्ता भोगलेल्या आघाडी सरकारलाही त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी राज यांच्या मनसेला पुन्हा नाकारले. देशात महापालिकांच्या कारभाराचा उत्कृष्ट नमुना मनसेने नाशिकमध्ये सादर करूनही राज यांना सत्तेपासून लांब ठेवले. या घडामोडीनंतर मनसेचे प्रगती पुस्तक काहीसे काठावर ढकलले. त्याचवेळी प्रसारमाध्यमांमधून, राजकीय वर्तुळातून मनसेवर टीका होऊ लागली. पहिल्याच निवडणुकीत एका दमात 13 आमदारांची मोट बांधणाऱया मनसेची आता धडगत नाही, अशा वावडय़ांना ऊत आला होता. पण राज यांची एकहातोटी आणि त्यांचे मोजके शिलेदार जमेल तसे उत्तर देत होते. राज ठाकरे हे तर विविध मुलाखती, चर्चासत्रे, भाषणातून आपली भूमिका ठासून मांडू लागले. मराठी तरुणांना नोकरी, मराठी भाषा, परप्रांतियांच्या लोंढय़ावर प्रहार हेच त्यांचे प्रमुख मुद्दे आजही मराठी तरुणांना आकर्षित करत आहेत. राज यांनी प्रादेशिक अस्मिता उचलून धरून नवनिर्माणाचा ध्यास आजही सोडलेला नाही. हे मांडण्याचे कारण एकच की, आता ते फेसबुकपेजच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, कामे, भूमिका, विविध कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वत: राज हे यातून संवाद साधणार आहेत.

 

आज राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांनी सोशल मीडियाला आपलेसे केले आहे. या पक्षातील प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते हे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ऍपवर सक्रिय आहेत. 2014च्या निवडणुकीत तर या सर्वच पक्षांनी आपली कामे, ध्येयधोरणे जनतेपर्यंत थेट पोहोचवली होती. आता हीच रणनीती राज ठाकरे यांनी अवलंबली आहे.

 

राज यांचे वक्तृव, भाषणशैली, आवाजातील भारदस्तपणा आणि मराठी भाषेची पकड यांच्या जोरावर आजही ते तरुणांमध्ये स्थान टिकवून आहेत. गुरुवारी फेसबुक पेजचे अनावरण करताच काही वेळातच तब्बल साडेचार लाख लाईक्सचा पल्ला गाठला. मनसे अध्यक्ष कार्यकर्त्यापर्यंत पोहोचत नाहीत, ते सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, त्यांचा जनतेशी संवाद होत नाही, अशा तक्रारी कायम व्हायच्या आता त्या होणार नाहीत, अशी आशा बाळगायला हवी.  फेसबुक पेजच्या माध्यमातून राज ठाकरे पक्षाच्या वाटचालीची दिशा ते सांगणार आहेतच तसेच त्यांच्यातील कलावंताची छबीही पहायला मिळणार आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून ते राजकीय फटकारे कसे ओढतात आणि त्यात कोणकोण सापडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

पक्षाला लागलेली घरघर, सततचे अपयश, सोडून जाणारे कार्यकर्ते आणि येणाऱया 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज यांनी फेसबुकच्या माध्यमातून पक्षाच्या मोर्चेबांधणीची मोट बांधण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगेल.

 

एकीकडे नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून, पुढच्या वाटचालीची दिशा दसऱयाच्या आधी ठरवणार असल्याचे सांगितले आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर त्यानीहे नवी संघटना उभारली आहे. या दोघांनी नव्या डावाच्या खेळीसाठी शड्डू ठोकला असला तरी राज ठाकरे यांचा फेसबुक पेजवरील नव्या खेळाचा हा नवा अंक म्हणावा लागेल.

-दीपक चौगले

Related posts: