|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मराठमोळय़ा दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ ऑस्कर शर्यतीत

मराठमोळय़ा दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ ऑस्कर शर्यतीत 

दिग्दर्शक अमित मसूरकरचे दिग्दर्शन : चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच मिळाली खूशखबर

प्रतिनिधी / मुंबई

अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजलेल्या आणि पुरस्कार मिळवलेल्या न्यूटन या सिनेमाची भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी ही घोषणा झाली. विशेष म्हणजे शुक्रवारीच संपूर्ण देशात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अमित मसूरकर या मराठमोळ्य़ा दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

भारतीय निवडणूक पद्धतीवर आणि त्यातील वास्तवावर हा चित्रपट भाष्य करतो. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने पुरस्कार मिळवले असून समीक्षकांनी याचे कौतुक केले आहे. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अंजली पाटील, रघुबीर यादव यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची निर्मिती कलर यलो प्रोडक्शनने केली असून इरॉसची प्रस्तुती आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीने शुक्रवारी या चित्रपटाची भारतातर्फे ऑस्करसाठी निवड केली. तेलगू सिनेमाचा निर्माते सीव्ही रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती निवडण्यात आली होती. या समितीमध्ये 14 सदस्यांचा समावेश होता. विविध भाषांमधील जवळपास 26 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड करण्यात आली. शुक्रवारी देशभरातील 350 क्रिन्समध्ये न्यूटन प्रदर्शित झाला आहे. राजकुमार रावच्या अभिनयासाठी त्याचे विशेष कौतुक होताना दिसत आहे. राजकुमार रावने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. तर अभिनेत्री अंजली पाटीलनेही फेसबुकवरून ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली.

यापूर्वी ऑस्करसाठी निवडण्यात आलेले भारतीय चित्रपट

फॉरेन लँग्वेज विभागात न्यूटन चित्रपटाची निवड झाली आहे. यापूर्वी अपूर संसार (1959), गाईड (1965), सारांश (1984), नायकन (1987), परिंदा (1989), अंजली (1990), हे राम (2000), देवदास (2002), श्वास (2004), हरिश्चंद्राची पॅक्टरी (2008), बर्फी (2012), कोर्ट (2015) या चित्रपटांची निवड झाली होती. तर अंतिम फेरीमध्ये केवळ तीनच सिनेमे पोहोचले होते. मदर इंडिया (1957), सलाम बॉम्बे (1998), लगान (2001) हे ते तीन चित्रपट आहेत.

 

देशाच्या लोकशाहीला मजबूती आणण्याचा प्रयत्न : अमित मसूरकर, दिग्दर्शक

न्यूटन चित्रपटाची ऑस्करसाठी निवड होणं ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटाद्वारे देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्याचा आणि सगळ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सध्या सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या बातमीमुळे जास्तीत जास्त प्रेक्षक जोडले जाणार आहेत.

 

चांगले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत : आनंद एल राय, निर्माते, कलर यलो प्रोडक्शन

चांगले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत. निर्मिती संस्था म्हणून आमच्यावरही जबाबदारी आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. अशी एकही संधी आम्ही दवडणार नाही. या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड होणे ही गरजेचीच बाब आहे.

Related posts: