|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » बॅडमिंटन क्रमवारीत सिंधूची दुसऱया स्थानी झेप सायनालाही चार स्थानाचा फायदा

बॅडमिंटन क्रमवारीत सिंधूची दुसऱया स्थानी झेप सायनालाही चार स्थानाचा फायदा 

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

कोरियन ओपनजेत्या पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी जाहीर झालेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, कारकिर्दीत सिंधूने दुसऱयांदा दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. फुलराणी सायना नेहवाललाही चार स्थानाचा फायदा झाला असून ती 12 व्या स्थानी आहे. चीन तेई तेजु यिंग अग्रस्थानी कायम आहे.

जागतिक बॅडमिंटन महासंघाने शुक्रवारी ताजी क्रमवारी जाहीर केली. गत आठवडय़ात यंदाच्या वर्षातील दुसरे सुपर सीरिज जेतेपद जिंकणाऱया सिंधूने दोन स्थानांनी प्रगती करताना दुसरे स्थान मिळवले आहे. यंदाच्या वर्षात सिंधूने दुसऱयांदा दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. याआधी, एप्रिलमध्ये इंडिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावल्यानंतर सिंधूने दुसरे स्थान मिळवले होते. विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱया सायना नेहवालाही चार स्थानाचा फायदा झाला आहे. ताज्या क्रमवारीत सायनाने 16 व्या स्थानावरुन 12 वे स्थान पटकावले आहे. रिओ ऑलिम्पिक सुवर्णजेत्या स्पेनच्या कॅरोलिन मारीनची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. सिंधूची कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱया जपानच्या नोझोमी ओकुहारालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. ती आठव्या स्थानी आहे.

पुरुष क्रमवारीत भारताचा स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत आठव्या स्थानी कायम आहे. बी साई प्रणित व प्रणॉयची एका स्थानाने घसरण झाली असून ते अनुक्रमे 17 व 19 व्या स्थानी आहेत. अजय जयरामलाही तीन स्थानाचा फटका बसला असून तो 20 व्या स्थानी विराजमान आहे. कोरियाचा सुन वान हो अग्रस्थानी कायम असून डेन्मार्कचा ऍक्सेलसन दुसऱया तर चीन लिन डॅन तिसऱया स्थानी आहे.

बॅडमिंटन क्रमवारीत टॉप-10 खेळाडू (महिला) –

 1. तेई तेजु यिंग (चिनी तैपेई)
 2. पी. व्ही. सिंधू (भारत)
 3. सुंग जी हय़ून (द.कोरिया)
 4. अकाने यामागुची (जपान)
 5. कॅरोलिन मारीन (स्पेन)
 6. सुन हय़ू (चीन)
 7. ही बिंगजिओ (चीन)
 8. नोझोमी ओकुहारा (जपान)
 9. इंटेनॉन (थायलंड)
 10. चेन युफेई (चीन)
 11. सायना नेहवाल (भारत)